गोंदिया : राज्य मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या धानाचे १०.८१ कोटींचे चुकारे अद्याप संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. मागील वर्षीचे म्हणजेच सन २०१३-१४ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या धानाचे हे चुकारे आहेत. आता या वर्षात धानाची खेप तयार होत असताना मागील वर्षाचे चुकारे थकून असल्याने शेतकरी वर्ग मात्र अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांकडून राज्य मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत धान खरेदी केली जाते. यात जिल्हा स्तरावर मार्केटींग फेडरेशनची मुख्य भुमिका असल्याचे बोलता येईल. जिल्ह्यातील सन २०१३-१४ ची धान खरेदीची माहिती जाणून घेतली असता, मार्केटींग फेडरेशनने ए-ग्रेडच्या २१३३.२० क्विंटल तर ३ लाख ४१ हजार ८४२.६३ क्विंटल अशा प्रकारे एकूण ३ लाख ४३ हजार ९७५.८३ धानाची खरेदी केली होती. आदिवासी विकास महामंडळाने ३ लाख २३ हजार १४ क्विंटल धान खरेदी केला होता. मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची किंमत ५० कोटी ६७ लाख ४५ हजार ८१७ रूपये एवढी आहे. तर यातील ४० कोटी ६५ लाख ५७ हजार ७८६ रूपयांचे चुकारे फेडरेशनकडून करण्यात आले असले तरी अद्याप १० कोटी १ लाख ८८ हजार रूपयांचे चुकारे थकलेले आहेत. आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची किंमत ४८ कोटी ५५ लाख ८८ हजार ८७३ रूपये असून यातील ४७ कोटी ७६ लाख १८ हजार ६५६ रूपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ७९ लाख ७९ हजार २१७ रूपयांचे चुकारे अद्याप थकलेले आहेत. अशाप्रकारे मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडे शेतकऱ्यांचे १० कोटी ८१ लाख ५८ हजार २४७ रूपये थकीत आहेत. शेतकऱ्यांचे धान व्यवसायीकाच्या हाती लागू नये म्हणून शासनाकडून या यंत्रणा कार्य करीत आहेत. मात्र जेव्हा शासकीय यंत्रणांकडूनच पाठ दाखविली जाते तर अशात मात्र दुसरा वाली कोण असा सवाल आता शेतकरी करू लागले आहेत. दोन महिन्यांनंतर पुन्हा शेतकऱ्यांचे धान विक्रीसाठी तयार होत आहेत. मात्र मागील विक्रीचेच पैसे हाती न आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दोन पैसे कमी मात्र रोख मिळत असल्याने व्यवसायिकांना धान विकणे जास्त परवडते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. (शहर प्रतिनिधी)
धान खरेदीचे ११ कोटींचे चुकारे थकले
By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST