केशोरी: काही दिवसांपूर्वी नागलडोह, भरनोली परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोट घडविण्यासाठी केलेला प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला होता. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांच्या पथकाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरीसह अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या प्रचार तोफा आता थंडावल्या असून, छुप्या प्रचाराला वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी नागलडोह आणि भरनोली परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणण्यासाठी आणलेले साहित्य पोलिसांच्या हाती लागले होते. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर लक्ष ठेवून या परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी केशोरीचे ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या पथकाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे.