बोंडगावदेवी : ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधीची प्रमुख जबाबदारी असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गावखेड्याचा विकास साधून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येते. प्रभाग समितीच्या आढावा बैठकीतून गावपातळीवरच्या विकासाभिमुख कार्याला गती देता येते. अनेक समस्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्गी लावल्या जावू शकतात. जिल्हा परिषद प्रभाग समितीच्या नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीतून क्षेत्रातील गावांचा समतोल विकास साधल्या जावू शकतो, असे प्रतिपादन बोंडगावदेवी जि.प. क्षेत्राचे सदस्य तथा जि.प. प्रभाग समितीचे अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केले. बोंडगावदेवी जि.प. प्रभाग समितीच्या १९ व्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पिंपळगाव-खांबी येथील जि.प. व प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी पिंपळगावचे प्रज्ञा डोंगरे, निमगावचे देवाजी डोंगरे, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, सिलेझरीचे धार्मिक गणवीर, खांबीचे शारदा खोटेले उपस्थित होते. या बैठकीला क्षेत्रातील सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य, शिक्षण कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा, वनविभाग, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिवणकर म्हणाले की, शासनाचा विकास कामांसाठी भरपूर निधी येतो. तो निधी आपल्या क्षेत्रात आणण्यासाठी ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. जागरूक लोकप्रतिनिधी असला तर विकासाला खिंड पडू शकत नाही. प्रभाग समितीची आढावा बैठक नियमित घेणे गरजेचे आहे. आपल्या जि.प. क्षेत्राचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रामीण जनतेच्या समस्यांची पूर्तता व्हावी, विविध शासकीय योजनांची माहिती गावपातळीवरील सामान्य माणसाला सहज उपलब्ध होऊन लाभ मिळावा यासाठी बोंडगावदेवी जि.प. प्रभागाची आढावा बैठक नियमित घेण्याचा आपला माणस असल्याचे ते म्हणाले. या बैठकीच्या माध्यमातून क्षेत्रातील ग्रामीण भागाचा समतोल विकास साधणे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. काही कामचुकार अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमुळे गावातील सामान्य माणसाला व्यवसायापासून दूर राहावे लागते ही शोकांतिका आहे. विषय प्रमुखांनी जनतेच्या प्रश्नाला अग्रक्रम देऊन विकासात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीची कारवाई प्रभाग समितीचे सचिव तथा पं.स. कृषी अधिकारी ऊईके यांनी पार पाडली. आढावा बैठकीत आरोग्य विभागाचे डॉ.ए.सी.सिरसाट, पशुसंवर्धन विभागाचा डॉ. वाघाये, शिक्षण विभागाचा केंद्रप्रमुख बी.डब्ल्यु. भानारकर, खेताडे, रतनपुरे, अभियंता ए.आर.शेख उपस्थित होते. (वार्ताहर)
आढावा बैठकीच्या माध्यमातून गावांचा समतोल विकास शक्य
By admin | Updated: March 30, 2015 01:18 IST