गोंदिया : दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाचा खून करण्यात आला. ही घटना रचलेला कट नसल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात कलम ३०४ अन्वये दोघांना तीन वर्षाची शिक्षा तर दोघांना निर्दोष सोडले आहे. तिरोडा तालुक्याच्या चिरेखनी येथील चौघांनी १३ आॅक्टोंबर २००८ च्या रात्री ८.३० वाजता दरम्यान लहू धनू मेश्राम (४५) या इसमाचा खून केला. लहू हा त्या दिवशी आपल्या घरी अंगणात मासेय्या भाजत असताना आरोपी रमेश शेंडे हा त्याच्या घरी आला. त्यावेळी लहुचा पुतण्या अनिल मेश्राम याच्या सोबत दारू पाजली नाही म्हणून बाचाबाची करू लागला. अनिलच्या मदातीसाठी काशिराम मेश्राम आले असताना आरोपी रमेश, सोमा, कुंजीलाल व कन्हैयालाल शेंडे या चौघांनी काशिरामला धक्काबुक्की केली. काशिरामच्या डोक्यावर काठीने मारल्यावर त्यांचा वाद सोडविण्यासाठी लहू गेला. लहूला सोमा व रमेशने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. लहूचा प्रथमोपचार तिरोडाच्या उपजिल्हा रूग्णालयात केल्यानंतर पुढच्या उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३०७, ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु परिस्थीतीचे अवलोकन केल्यावर त्याला मारण्यासाठी हा कट नसल्याने कलम ३०२ ला कलम ३०४ मध्ये बदलवून या प्रकरणातील आरोपी रमेश शेंडे व सोमा शेंडे या दोघांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली. कलम ३०४ अन्वये ३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकाला पाच हजार रूपये दंड, कलम ३२४ नुसार २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जी. गीरटकर यांनी केली. सरकारी वकील म्हणून अॅण्ड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. (तालुका प्रतिनिधी)
खुनातील आरोपीला तीन वर्षाची शिक्षा
By admin | Updated: April 2, 2015 01:11 IST