विजय रहांगडाले : तिरोडा येथे महाप्रज्ञा बुद्ध विहारात ‘ज्ञानदिन’ साजरा तिरोडा : शहरातील महाप्रज्ञा बुद्ध विहार अंतर्गत समाजभवन तयार करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, त्यासाठी शासनातर्फे तीन कोटींचा निधी खेचून आणण्याची ग्वाही आमदार विजय रहांगडाले यांनी दिली. महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘ज्ञानदिन’ म्हणून साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये होते. अतिथी म्हणून माजी आ. भजनदास वैद्य, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, न.प. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष उमाकांत हारोडे, कृउबासचे प्रशासक चिंतामन रहांगडाले, नगरसेवक विजय बन्सोड, नगरसेवक राजेश गुणेरिया, महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, सचिव के.के. वैद्य, कोषाध्यक्ष रत्नाकर नंदागवळी, सहसचिव वंदना चव्हाण उपस्थित होत्या. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान महाप्रज्ञा बुद्ध विहार अंतर्गत संचालित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्रातील यशस्वी विद्यार्थी सतीश बिरणवार यांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ व पुष्पगुच्छ देवून तसेच बुद्ध विहाराला भरघोस देणगी देणाऱ्यांचासुद्धा आ. विजय रहांगडाले व नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आ. भजनदास वैद्य यांनी भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथ घोषित व्हावा, असे मत व्यक्त केले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलात आणण्याचे आवाहन केले. विहार समितीने गेल्या १० महिन्याच्या कार्यकाळात अनेक विधायक कार्य केले. मात्र विहारातील भंते निवासाच्या वर अद्यावत सभागृह व समाजभवन तयार करण्याची गरज अतुल गजभिये यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून व्यक्त करून बुद्ध विहाराच्या विकासासाठी सहकार्याचे आवाहन केले. महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे सचिव के.के. वैद्य यांनी पुढे करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती प्रास्ताविकातून मांडली. याप्रसंगी महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीतर्फे उपस्थित सर्वच मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन समितीच्या सदस्य पंचशीला रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी सीमा साखरे, सारंगा वासनिक, ए.व्ही. दहिवले, तेजराम मेश्राम, डॉ.के.एल. शेंडे, गुणवंत बन्सोड, उमेश बन्सोड, प्रणव भास्कर, देवानंद सुखदेवे, मिलिंद भालेराव, सुचित चव्हाण यांनी सहकार्य केले.
तीन कोटींचे समाजभवन तयार करणार
By admin | Updated: April 17, 2017 01:09 IST