साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कारूटोला ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्राम सलंगटोला येथे शेतात ठेवलेले धानाचे तीन पुंजणे जळून खाक झाले. २० डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे मात्र शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार, सलंगटोला येथील शेतकरी मोतीराम डोमा भांडारकर यांची नऊ एकर शेती आहे. यंदा त्यांनी जय श्रीराम व आरपी प्रजातीचे धान लावले होते व दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांची कटाई झाली होती. कटाई करण्यात आलेल्या धानाची मळणी करावयाची असल्याने भांडारकर यांनी क टाई केलेला धान शेतातच तीन पुंजणे तयार करून ठेवला होता. २१ डिसेंबर रोजी सकाळी ते शेतात गेल्यावर त्यांना धानाचे तिन्ही पुंजणे जळून खाक झाल्याचे दिसले. संपूर्ण धान जळाल्याने भांडारकर यांच्यावर आभाळच फाटले असून यामध्ये त्यांचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपच मिलींद गजभिये व पटवाऱ्यांनी घटनास्थळारव जाऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे धानाचे पुंजणे ज्या ठिकाणी लावण्यात आले होते. त्या ठिकाणापासून बऱ्याच अंतरावर कुणाचेही घर नसून शिवाय तेथून विद्युत वाहिनीही जात नाही. अशात कुणीतरी जाणून पुंजण्याला आग लावल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. नेमका प्रकार काय तो तपासानंतरच उघडकीस येणार मात्र भांडारकर यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
धानाचे तीन पुंजणे जळून खाक
By admin | Updated: December 21, 2014 23:01 IST