गोंदिया : राजनांदगाव वरुन बालाघाटला परतणाऱ्या तरुणाला तिघांनी लुटले. या लुटणाऱ्या गोंदियातील तीन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. बालाघाट जिल्ह्याच्या कोसमी येथील अश्विन नागपुरे नावाचा तरुण एका कंपनीच्या सर्व्हेच्या कामासाठी राजनांदगाव येथे गेला होता. तिथून दरेकसा मार्गे परत येत असताना दरेकसा येथील घाटीवर रात्रीच्यावेळी तीन तरुण एका गाडीवर होते. त्यांनी अश्विनला आपल्या गाडीवर आमच्यातील एकाला बसवावे असा आग्रह केला. त्यामुळे अश्विनने एकाला आपल्या गाडीवर बसवून ते आरोपी अश्विनसोबत सालेकसाकडे येत होते. सालेकसा दोन ते तीन किलोमिटर अंतरावर असल्याचे लक्षात येताच अश्विनच्या गाडीवर मागे बसलेल्या तरुणाने लघू शंका करण्याचा बहाना केला. लघूशंकेसाठी वाहन थांबविताच तिन्ही आरोपींनी अश्विनला बेदम मारहाण करुन त्याच्या जवळील बॅग व गाडी हिसकावून नेली. गाडी घेवून ते सालेकसाकडे पळाले. अश्विन पायीपायी सालेकसाकडे येत असताना पुन्हा काही वेळातच आरोपी सालेकसाकडून दरेकसाकडे जावू लागले. जाताना पुन्हा अश्विनला त्यांनी लात मारून पुढचा मार्ग गाठला. यावेळी अश्विनने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार पोलिसात नोंदविली. आरोपींनी लुटलेली मोटरसायकल गोंदियात विक्री करण्यासाठी आणली असता घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेण्यात मशगुल असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींचा पत्ता काढून त्यांना अटक केली. यात राजेंद्र बबलू बारापात्रे (२६) रा. बनाथर, अकरम करीम शेख (२५) रा. संजयनगर मुर्री, विक्रम पवनसिंग बैस (२८) रा. गौतमनगर गोंदिया या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींनी अश्विन जवळील मोबाईल, बॅगमधील तीन हजार रुपये रोख व मोटरसायकल हिसकावून नेले. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा चांगलाच समाचार पोलिसांनी घेतल्यामुळे आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जयराज रनवरे, हवालदार अर्जुन कावळे, लिलेंद्र बैस, राजेश बढे, राजकुमार खोटेले, अजय सव्वालाखे, विनय शेंडे, संतोष काळे, सोहनलाल लांजेवार यांनी केली. आरोपींना भादंवि कलम ३९४, ३४ अन्वये अटक करण्यात आली आहे. आरोपीने अश्विन जवळील पळविलेली मोटरसायकल जप्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तरुणाला लुटणाऱ्या तिघांना अटक
By admin | Updated: July 28, 2016 00:06 IST