गोंदिया : तिरोडा पोलिसांनी ११ आॅक्टोबर ते ९ डिसेंबर दरम्यान तिरोडा पोलिसांंनी केलेल्या कारवाईमध्ये मोटार वाहन कायद्यान्वये ७५२ प्रकरण दाखल करुन २०० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे यातील ४७ वाहन हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे होते. याशिवाय दारु बंदीच्या एकूण ६२ प्रकरणांमध्ये ६३ आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ८९ हजार ४८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या अवैध रेती वाहतूक चोरी प्रकरणी एकूण २२ आरोपींना अटक करुन १२ ट्रॅक्टर जप्त केले आहेत. त्यांच्याकडून ५९ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या १८ जणांना अटक केली असून एकूण २०५ जनावरांना मुक्त केले आहे. तर ९ वाहन जप्त के ले आहे. यामधून ५१ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये ५ आरोपींना अटक केली आहे. ५ सिलिंडर जप्त केले आहे.मागील काही महिन्यांपासून तिरोडा पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय जोमात सुरु होता. या व्यवसायावर अंकुश लावणे पोलिसांसमोर एक आव्हाण होते. मात्र, तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अवघ्या तीन महिन्यांच्या काळात विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांवर अंकुश लावून त्यांच्याकडून दंड वसूल केले. काहींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. पोलिसांच्या या कामगिरीने अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तिरोडा पोलीस ठाणे हद्दीत या व्यवसायांवर लगाम लागण्यास पोलिसांना यश आले आहे.अशाप्रकारे तिरोडा पोलिसांचे अवैध व्यवसाय थांबविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहे. मागील तीन महिन्यांचा विचार केल्यास येत्या काळात तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत अवैध व्यवसाय करणाऱ्यांना ही एक चांगली चपराक आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचौरे, अजितकुंभार, हवालदार विजय लाडे, सचिन टेंभुर्णीकर, बावणे, पिपरेवार, बादलवार, उईके, हलमारे, गेडाम, दिघोरे, शरणागत यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
तिरोडा पोलिसांनी केली ७५२ वाहनांवर कारवाई
By admin | Updated: December 13, 2014 01:42 IST