सीईओंनी दिले आदेश : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनाची यशस्वी गोंदिया : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन यासह अन्य मागण्यांना घेऊन ३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन यशस्वी ठरले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध करवून देत अन्य समस्या त्वरीत निकाली काढण्याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य कार्यालय व पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आॅक्टोबर महिन्यापासून वेतन थकून आहे. कर्मचाऱ्यांचे थकून असलेले चार महिन्यांचे वेतन काढण्यात यावे यासह वर्ग ४ मधून वर्ग ३ मध्ये पदोन्नतीची पदे भरण्याबाबत त्वरीत कारवाई करण्यात यावी, १२ व २४ वर्षे पूर्ण झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कालबद्ध योजनेचा लाभ देण्यात यावा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन देयक स्वतंत्र तयार करण्यात यावे, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या सेवा जेष्ठता यादीतील त्रुट्या दुरूस्त करून स्वतंत्र सेवा जेष्ठता यादी पुरविण्यात यावी, कर्मचाऱ्यांचा प्रवासभत्ता व इतर भत्ते त्वरीत निकाली काढण्यात यावे, फेब्रुवारीपासूनचे मासीक वेतन ५ तारखेपर्यंत नियमीत काढण्यात यावे आदी मागण्यांसाठी संघटनेने ३ फेब्रुवारी रोजी जिल्हापरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश कुंभलवार, सरचिटणीस लिलाधर तिबुडे, उपाध्यक्ष नामदेव मेश्राम, कोषाध्यक्ष मोहन पुरी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलना दरम्यान सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली.यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या आॅक्टोबर महिन्यापासून थकीत असलेल्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध करून दिला असल्याचे सांगीतले. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अन्य समस्या त्वरीत निकाली काढण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले. तसेच संघटनेच्या शिष्टमंडळाला आंदोलन मागे घेण्याचे सुचविले. विशेष म्हणजे याप्रसंगी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय वासनीक उपस्थित होते व त्यांच्या आवाहनावरून महिला व पुरूष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान संघटनेच्यावतीने आंदोलन मागे घेण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
वेतनासाठी अनुदान मिळणार
By admin | Updated: February 5, 2015 23:12 IST