लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मराठवाडा किंबहुना महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनाचा बॅकलॉग वाढत चालला आहे. फक्त ८ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे, तर ९२ टक्के शेतजमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे विदर्भात सिंचनाची पर्याप्त व्यवस्था करणे केंद्र व राज्य सरकारला गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भात सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याची गरज आहे, असा ठराव एकमताने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पारीत केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या दशा व दिशा या बाबीवर सविस्तर चर्चा करीत इतर पाच ठराव घेण्यात आले.भारतीय किसान संघाचे प्रांतीय तिसरे अधिवेशन गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. किसान संघाच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अधिवेशनात घेतलेल्या ठरावांबाबत माहिती देत होते. वैनगंगा ते पैनगंगा या दोन नद्यांना जोडून सहा जिल्ह्यांचा सिंचनाचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. या दोन्ही नद्यांना जोडणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. विदर्भात सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी, या उद्देशाने किसान संघाने सिंचन शोध यात्रा राबविली. या यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ४० प्रकल्प अपूर्ण असल्याची माहिती समोर आली. गोसी खुर्द सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे फक्त २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय अनेक प्रकल्प रखडली आहेत. म्हणून अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करावे व सिंचन क्षेत्रात वाढ करावी, या मागणीचा ठराव प्रामुख्यानेघेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी २४ तास विद्युतपुरवठा करावा, विदर्भात शेतमालावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी, विदर्भामध्ये प्रामुख्याने भात, संतरा, लिंबू, ऊस, तूर ही पिके घेतली जातात. शिवाय भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, विदर्भात एकही प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतमाल कवडीमोल भावात विक्री केला जातो. यासाठी विदर्भात केंद्र व राज्य सरकारने प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी.
महागाईमुळे शेती संकटात - व्यवसायाच्या लागवड खर्चामध्ये वाढ होत चालली आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल होत चालला आहे. शेतमालाला लागवडीपेक्षा किमान दीडपट अधिक भाव पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रांतीय अध्यक्ष राजेश राणे, महामंत्री बाबुराव देशमुख, उपाध्यक्ष बाबाराव कपिले, मावळते अध्यक्ष नानासाहेब आकरे, संघटन मंत्री कैलास ढोले, उपाध्यक्ष पांडुरंग गायकी उपस्थित होते.