वडेगाव : जवळील जि.प. उच्च प्राथमिक शाळा भजेपार येथे आरटीईनुसार आठवा वर्ग जोडण्यात आला. वर्ष संपत आले तरी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात न आल्याने शाळेला १ जानेवारीपासून कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी भजेपार यांनी दिला आहे. प्राप्त माहितीनुसार पंचायत समिती तिरोडा, केंद्र बडेगाव अंतर्गत येणाऱ्या भजेपार शाळेला आरटीर्ठ नियमानुसार जून २०१४ पासून आठवा वर्ग जोडण्यात आलेला आहे. शाळेत २५२ विद्यार्थी संस्था व सात शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेतील एक वर्ग सतत वाऱ्यावर असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम पडत आहे. शिवाय शसनाचे उपक्रम, क्रीडा स्पर्धा, मतदार यादी प्रशिक्षण व इतर तत्सम कामांचा पिंजाणा सतत सुरुच असतो. अशा परिस्थितीत व आरटीई निकषानुसार दोन शिक्षकांची नितांत गरज आहे. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी-पदाधिकारीच एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी टाळत आहेत. विशेष म्हणजे भजेपार हे गाव जि.प. शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष मदन पटले, यांच्या जि.प. क्षेत्रातील आहे. एवढेच नव्हे तर पं.स.चे माजी उपसभापती धानसिंग बघेले यांचे गाव असूनही शाळेप्रती त्यांच्या उदासिनतेमुळे गावकरी संतप्त आहेत. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निराशाने होत टेकले असून अधिकारीही गावकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत शिक्षक नियुक्ती करा अन्यथा १ जानेवारी पासून शाळेला कुलूप ठोकण्याचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने घेतला असून त्यांची जाणीव वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांना करुन देण्यात आली आहे. (वार्ताहर)
शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकणार
By admin | Updated: December 27, 2014 22:53 IST