गोंदिया : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागाच नसल्याने फक्त कचऱ्याच्या स्थानांतरणाचे काम केले जात असल्याचा प्रकार बघावयास मिळत आहे. कारण येथील मटन मार्केट परिसरातील कचरा उचलून काही दिवसांपूर्वी मोक्षधाम परिसरात टाकण्यात आला. तर आता तेथून उचलून मोक्षधामच्या मागे टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. यातून ‘इथला उचलून, तिथे टाका’ हा प्रकार नगर परिषदेत सुरू असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी मटन मार्के टमध्ये बसणाऱ्या मटन व मासे विकणाऱ्यांनी कचरा उचला अन्यथा कर देणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यावर नगर परिषदेने त्वरीत मटन मार्के टमधील कचऱ्याची उचल करून त्यांच्या मागणीची पूर्तता केली. विशेष म्हणजे, इथून उचललेला कचरा मोक्षधाम परिसरात टाकण्यात आला होता. मोक्षधामच्या गेट समोरच कचऱ्याचे ढिगार लागले होते. त्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीने मोक्षधामात येणाऱ्या लोकांनाही त्रास होऊन लागला होता. हा प्रकार लक्षात येताच मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या आदेशावरून येथूनही कचरा उचलून मोक्षधामच्या मागील बाजूला टाकण्यात आला आहे. तर मोक्षधामच्या समोरची जागा सपाट करून त्यावर मलमा टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या मोक्षधामच्या समोरची जागा साफ करण्यात आली आहे. मात्र शहरात फक्त कचऱ्याचे स्थानांतरण होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार मात्र आणखी किती दिवस चालणार व किती कचरा कोठे-कोठे टाकला जाणार हे समजण्यापलीकडे आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेकडून कधी हड्डीटोली रिंगरोड मार्गावर, कधी मोक्षधाम परिसरात तर कधी शहराच्या बाहेरील भागात कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसते. या प्रकाराचा मात्र त्या भागातील लोकांना त्रास होणार यात शंका नाही. मात्र नगर परिषदेकडे उपाय नसल्याने ते आपले काम करीत असल्याचे दिसते. (शहर प्रतिनिधी) प्रकल्पाची नितांत गरज ४गोंदिया शहराचे आकारमान व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कचऱ्यात वाढ होणार हे तेवढेच खरे आहे. अशात नगर परिषदेकडे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजेचे आहे. मात्र खेदाची बाब अशी की, गोंदिया नगर परिषदेकडे आताही घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेसाठी नगर परिषदेची काही जागाही शोधल्या मात्र काही ना काही आडकाठी आली व कार्यक्रम फिस्कटला. शिवाय टेमनीच्या जागेसाठीनगर परिषदेला कोट्यवधी रूपयांचा फटका येणार असल्याची माहिती आहे. ते काही असो, मात्र घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प होत नाही तोवर कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य नाही.
एकीकडून उचला, दुसरीकडे टाका
By admin | Updated: August 30, 2016 02:10 IST