गोंदिया : ४० टक्के उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील घेण्यात यावे, अशी मागणी करीत अनुकंपाधारक संघटनेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनियुक्त आमदार अभिजित वंजारी यांना निवेदन देण्यात आले.
नियमित भरती होत नसल्याने अनुकंपाधारक आपल्या हक्काला मुकत आहेत. अशात वयोमान वाढून कित्येक अनुकंपाधारक अपात्र होत आहेत. शासन निर्णयाला डावलून केलेली प्रक्रिया नक्कीच अनुकंपाधारकाच्या अंगलट येईल यात शंका नाही. करिता १५ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे सन २०२० मधील २० टक्के व सन २०२१ मधील २० टक्के असे एकूण ४० टक्के उमेदवार अनुकंपाधारकांमधून घेण्यात यावे, अशी मागणी अनुकंपाधारक संघटनेने केली असून आमदार वंजारी यांना निवेदन दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अनुकंपाधारक संघटनेचे अध्यक्ष संजय हत्तीमारे, संदीप मानकर, अभय पालेवार, योगेश पटले, राकेश बिसेन, चंद्रकला ईश्रावत, मोनिका मानकर यांचा समावेश होता.