जिल्हा प्रशासनाचा निर्णय : न.प. नव्याने प्रस्ताव ठेवणारपरसवाडा : तिरोडा नगर परिषदेकडून स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाला जिल्हा प्रशासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले आहे. दरम्यान नगर परिषदेकडून यासंदर्भात नव्याने ठराव मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले.यापूर्वी घेतलेल्या ठरावात नागरिकांचे हित योग्य प्रकारे जोपासले नसल्याचे सांगत एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासोबतच न्यायालयात याचिका टाकली होती. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने त्रुटी काढल्या. त्यावरून न.प.चा ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केला. मागील वर्षी १८ डिसेंबर २०१५ रोजी येथील नगर परिषदेच्या मासिक सभेत तिरोडा शहरालगत असलेल्या सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाबाबत ठराव पारीत करण्यात आला होता. मात्र संबंधित ठराव योग्यरित्या पारीत न केल्याची तक्रार सुनील कुंभारे व इतर तीन जणांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकात्र्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांच्यासह सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले. ठरावाची पडताळणी केली असता ठरावाचे सुचक ओमप्रकाश येरपुडे हे ठराव घेतेवेळी सभागृहात गैरहजर असल्याचे कळले. ते सभागृहात हजर असल्याचे कुठलेही ठोस पुरावे व चित्रफिती (व्हिडीओ शुटींग) मुख्याधिकारी सादर करु शकले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी नगर परिषद औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३०८ नुसार नगर परिषदेकडून घेण्यात आलेला संबंधित ठराव स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला.या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने संबंधित पदाधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाले आहे. पुढे काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
तिरोड्यातील सिंगाडा तलाव सौंदर्यीकरण प्रस्तावाला स्थगिती
By admin | Updated: November 17, 2016 00:17 IST