सडक-अर्जुनी : जिल्ह्यात संसर्गाचा उद्रेक सुरू आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात संसर्गाने शिरकाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेक रुग्णांची तारांबळ उडत आहे. ही बाब घेऊन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर या कोविड सेंटरला पाच ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला आहे.
तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक रुग्णांचा प्राणवायू कमी होत असल्याने त्यांना त्यांची गरज आहे. अशावेळी रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता प्रशासन जिकिरीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेत चंद्रिकापुरे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी त्यानंतर वितरकामार्फत बोलणी करून पाच ऑक्सिजन सिलिंडर कोविड सेंटरला पाठविले. आमदार चंद्रिकापुरे यांनी प्रत्यक्ष कोविड सेंटरमधील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी किसान आघाडीचे महासचिव एफ.आर.टी. शाह, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, सुबूर शेख उपस्थित होते.