अर्जुनी मोरगाव : धाबेटेकडी, पवनी,कोहलगाव, रामपुरी, झाशीनगर व परिसरात गेल्या १५ दिवसांपासून विजेचा कमी दाब असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर अर्जुनी मोरगाव येथील वीज कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
घरगुती व शेती पंपधारकांना गेल्या १५ दिवसांपासून खंडित व कमी दाबयुक्त वीज पुरवठयाचा सामना करावा लागत आहे. घरातील विजदिवे, पंखे, कुलर, शेतीपंप, संगणक,व विजेवर चालणारी उपकरणे व्यवस्थित चालत नाही. परिसरात पाणीटंचाई आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रामपुरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजना कमी दाबामुळे निट चालत नाहीत. त्यामुळे परिसरातील जनतेसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. उभ्या धानशेतीला व्यवस्थित सिंचन होत नसल्याने पीक करपायला लागली आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र देण्यात आले असून येत्या दोन दिवसात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर गावकरी व उद्योजकांनी पवनी धाबे येथील चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.