गोंदिया : उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे बारावीत असलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज मागविले जातात. मात्र यावर्षी हे अर्ज सरळ नागपूरच्या विशेष समाजकल्याण कार्यालयातील जात पडताळणी प्रमाणपत्र विभागाकडे विद्यार्थ्यांनी सादर करावे, असे आदेश देण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थी अडचणीत आले आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर अभ्यास करायचा की जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नागपूरच्या चकरा करायच्या, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. उच्च शिक्षणासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात जात पडताळणी प्रमाणपत्र मागविले जाते. या पडताळणी प्रमाणपत्रासाठी बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागता. मागच्यावर्षीपर्यंत विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर अर्ज मागवून शिबिरे घेतली जात होती. त्या शिबिरात जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जात होते. यावर्षी ६ आॅगस्ट व ११ आॅगस्ट या दोन तारखा निघून गेल्या, मात्र या तारखांना विद्यार्थ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्जच मागविण्यात आले नाही. वेळ गेल्यानंतर आता शिबिरे कशी घ्यायची म्हणून विशेष समाजकल्याण विभाग नागपूरने एक शक्कल लढविली व ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सरळ कार्यालय गाठून स्वत: अर्ज करावे असे आवाहन केले. त्यामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. गोंदिया जिल्ह्यात विज्ञान शाखेत बारावी करणारे यावर्षी ७८५१ विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळ नाही, कुणाकडे पैसा नाही तर अनेक विद्यार्थ्यांनी नागपूरच पाहिले नाही अशी परिस्थिती असताना परीक्षेच्या तोंडावर विशेष समाजकल्याण विभाग त्यांचा छळ करीत आहे. नागपूरला येण्याजाण्यासाठी पैशाचा अपव्यय व वेळ वाया जाईल त्यामुळे जिल्हा स्तरावर सोय करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धांदल
By admin | Updated: November 29, 2014 01:37 IST