इंदोरा बुज : तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी खुर्द येथील रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर मागील २० दिवसांपासून बंद असल्यामुळे या गावातील विद्यार्थी व नागरिक अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे त्यांचे पेपर होऊच शकत नाही. टॉवर बंद केल्यामुळे या गावातील नागरिकांचे जिओचे मोबाईल बंद झाले असून, नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे या गावातील सर्वच विद्यार्थी अडचणीमध्ये आले असून, परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
येथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील एक वर्षापूर्वीपासून ग्राम करटी खुर्द येथे जिओ कंपनीच्या व्यवस्थापकांनी याच गावातील शेतकरी किशोर ठाकरे यांच्या शेतामध्ये गावातच टॉवर उभा केला. टॉवरचे काम पूर्ण होऊन मोबाईल नेटवर्कची सेवासुद्धा उपलब्ध झाली. गावातच टॉवर झाल्यामुळे गावातील प्रत्येकाने जिओ कंपनीचे सीमकार्ड घेऊन मोबाईलचा वापर करू लागले. गावामध्येच मोबाईल टॉवर असल्याने ऑनलाईन कामे व्यवस्थित सुरू होती. यातच जेव्हापासून गावामध्ये टॉवर लावण्यात आले, त्यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकांनी ग्रामपंचायत करटी खुर्दची कुठलीच परवानगी घेतली नाही. फक्त शेतमालकाला विचारून टॉवर उभा करण्यात आला. मागील एक वर्षापासून टॉवर सुरू असताना ग्रामपंचायतीने कर आकारणी केली. मागील तीन महिन्यांपासून कंपनीच्या व्यवस्थापकाला ग्रामपंचायतचे ६० हजार रुपये भरण्यासाठी मागणी बिल दिले; परंतु कंपनीने कर भरले नाही. सरपंच, ग्रामसेवक यांनी वारंवार टॅक्स भरण्यासंबंधी नोटीस दिल्या; परंतु कंपनी याकडे डोळेझाक करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ग्रामपंचायत कमिटीने ठराव घेऊन टॉवर पंधरा दिवसांपूर्वी सील केला आहे. तरीसुद्धा या कंपनीच्या व्यवस्थापकाने अजूनपर्यंत कुठलीच दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी व व पंचायत समिती स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन टॉवर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
........
परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता
मागील पंधरा दिवसांपासून टॉवर बंद असल्यामुळे गावातील सर्वाचे जिओचे नेटवर्क बंद झाले. सर्वत्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एप्रिल महिना हा परीक्षेचा असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे पेपर हे ऑनलाईन सुरू आहेत. अनेक विद्यार्थी कुठल्या न कुठल्या परीक्षेला बसले आहेत. या गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होणार आहेत.
........
‘टाॅवर व्यवस्थापकाला ग्रा.पं.चे कर भरण्यासाठी वारंवार नोटीस देऊन ऐकत नाही आणि टाॅवर लावताना ग्रा.पं.ची कुठलीच परवानगी घेतली नाही. ग्रा.पं.नी कायद्यानुसार कर आकारणी करून मागणी केली आहे. ६० हजार रुपये थकीत असल्यामुळे टॉवरला रीतसर सील केले आहे.
- वर्षा मालाधारी, सरपंच