कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आता सुमारे ४ महिने होत असून त्यांची मागणी काही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्मचारीही आपल्या मागणीवर ठाम असून ते सुद्धा कामावर येण्यास तयार नाहीत. यावर महामंडळाने कर्मचाऱ्यांना कारवाई करून व पगारवाढ देऊन आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही मोजकेच कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र चालक-वाहन कामावर न परतल्याने महामंडळाचा प्रयोग फसला. अशात आता महामंडळाने खासगी चालकांना कामावर घेऊन एसटी पुन्हा रस्त्यावर उतरवून घेतली आहे. मात्र, यातही मोजकेच खासगी चालक मिळाल्याने मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. ते काही असो मात्र आजघडीला एसटीचे ‘स्टेअरिंग’ या खासगी चालकांच्या हातीच असल्याचे दिसून येत आहे.
६५ जणांवर कारवाई आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना कसे तरी कामावर परत आणण्यासाठी महामंडळाने कारवाया केल्या. यामध्ये गोंदिया आगारातील ३० कर्मचाऱ्यांवर तर तिरोडा आगारातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
८ खासगी चालक भरती n महामंडळाच्या आदेशानुसार आगारांना खासगी चालक देण्यात आले आहेत. यांतर्गत गोंदिया आगाराला ५ तर तिरोडा आगाराला ३ चालक मिळाले आहेत. अशा एकूण ८ चालकांच्या माध्यमातून सध्या दोन्ही आगारांतून एसटीच्या जेमतेम फेऱ्या मारल्या जात आहेत. यामुळेच आता एसटीची दारोमदार या चालकांच्या हाती असेच म्हणावे लागेल.
वाहक म्हणून इतर विभागातील कर्मचारी वाहक म्हणून आगारातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा तात्पुरता वापर करावा, असे महामंडळाचे आदेश होते. त्यानुसार आगारात तसा प्रयोग करता येईल. मात्र, चालकच नसल्याने अगोदरच मोजक्या फेऱ्या सुरू असल्याने तशी गरज दिसून आली नाही.
आगाराला मिळालेल्या खासगी चालकांच्या माध्यमातून सध्या काही फेऱ्या मारल्या जात आहेत. चालकांची संख्या वाढल्यास फेऱ्यांमध्येही वाढ करता येईल. - संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया