गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित स्थानिक एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात गृहव्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमधील ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे हे चर्चासत्र संस्थेचे सरंक्षक प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल तसेच सचिव आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली सदर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलन, विद्यापीठ गीत आणि स्वागतगीताने झाली. आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांनी चर्चासत्राच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी असलेले एल.ए.डी. कॉलेज नागपुरच्या डॉ. सुनीता बोरकर यांनी चर्चासत्रासंबधी आपले विचार व्यक्त केले. तसेच चर्चासत्राच्या संयोजिका डॉ. रेखा नागपुरे यांनी प्रास्ताविक सादर केले. सदर चर्चासत्र दोन सत्रात विभाजीत करण्यात आले होते. प्रथम सत्राचा उपविषय ‘वर्क प्लेस ट्रेस इन वर्किंग वूमन अॅन्ड इट्स मॅनेजमेंट’ होता. यावर कॅप्स नागपूरचे प्राचार्य डॉ.ए.एम. शेख यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी शासकीय पी.जी. गर्ल्स कॉलेज रायपूरहून आलेल्या डॉ. पूर्णिमा शाहू होत्या. याप्रसंगी फॅमिली रिसोर्स मॅनेजमेंटतर्फे या विषयाशी सबंधित पोस्टर स्पर्धा झाली. सोबतच गृहसजावट, हस्तनिर्मिती वस्तू आणि विविध आकारप्रकारच्या रांगोळ्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. यात प्रा. सीमा बिजेवार यांचे सहकार्य लाभले. जेवणानंतर व्दितीय सत्राला सुरूवात झाली. या सत्राचा उपविषय ‘ट्रेस इन वर्किंग वूमन एन्ड इट्स मॅनेजमेंट’ होते. भिलाई येथील महिला महाविद्यालयाच्या डॉ. संध्या मदनमोहन यांच्या अध्यक्षतेखाली या सत्राचे वक्ते आयुर्वेदिक कॉलेज गोंदियाच्या डॉ. वंदना अलोनी होत्या. तसेच गर्ल्स कॉलेज सुरत, गुजरातहून आलेल्या डॉ. सुहास वैद्य यांनी तणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचार या विषयावर आपले विचार व्यक्त केले. दोन्ही सत्राचे संचालन प्रा.दिशा गेडाम तसेच प्रा. रिनी वसिष्ठ यांनी केले. तसेच संयोजिका डॉ. रेखा नागपुरे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी चर्चासत्रात उपस्थित सहभागींनी सादर केलेल्या शोधप्रबंधाला आयएसबीएन क्रमांकसह स्मरणिकेच्या रुपात प्रकाशित करण्यात आले. या स्मरणिकेचे विमोचन मंचावर उपस्थित चर्चासत्राचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुषमा नरांजे व ग्रंथपाल राजश्री वाघ यांनी केले. डॉ. रेखा नागपुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
आधुनिक जीवनशैलीत स्त्रियांमधील ताणतणावाचे व्यवस्थापन
By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST