गोंदिया : गोंदिया तालुक्यापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण हे तिरोडा तालुक्यात आहे. मंगळवारी सुद्धा तिरोडा तालुक्यात १३० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी त्या तुलनेत सुविधा नसल्याने रुग्णांना गोंदिया येथे रेफर केले जात आहे. त्यामुळे तिरोडा येथील आयटीआयमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करुन त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ५० खाटांची संख्या करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी अद्यापही खाटांची संख्या वाढविण्यात आली नाही. त्यामुळे या रुग्णालयावरील ताण वाढला आहे. तर मृतकांच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची समस्या कायम आहे. अशात या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात तिरोडा येथील आयटीआयमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करुन त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात डॉक़्टरांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच ऑक्सिजनसह आवश्यक बाबींची सोय करण्यात यावी. यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होईल. जिल्ह्याधिकाऱ्यांनी याची वेळीच दखल घेण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.