लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शिक्षण विभागाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. निधी खर्च करुनही सडक-अर्जुनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या तुकडीच्या ३६ शाळा आहेत. वर्ग १ ते ४ च्या तुकडीचे ७७ शाळा आहेत तर वर्ग १ ते ८ च्या तुकडीचे ४ शाळा तालुक्यात पहावयास मिळतात. एकूण ११७ शाळांमध्ये ७ हजार ९५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्याच्या केजी १, केजी २ व सीबीएससीच्या शाळांमुळे पालकांचा कल आता इंग्रजी शिक्षणाकडे वळला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, सडक-अर्जुनी, डोंगरगाव डेपो, डव्वा, पांढरी, कोकणा-जमी, खजरी येथील बहुतेक पालक आता दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी गोंदिया, साकोली, गोरेगाव, नागपूर, भंडारा आदी शहरांच्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवित आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या विद्यार्थी संख्या फारच कमी होत आहे. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४ शाळा तर १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १८ शाळा सडक अर्जुनी तालुक्यात आहेत. १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत जि.प.कडून दोन शिक्षक देवून लाखोंचा खर्च केला जातो. पण त्या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेचा दर्जा पाहिजे तसा गुणवत्ता देणारा दिसून येत नाही. तालुक्यात काही शाळेत तर दोन शिक्षकांचा वर्ग आहे. पण मुले कमी असल्यामुळे एक शिक्षक तीन दिवस तर दुसरा शिक्षक उर्वरित दिवस शाळा चालवून शैक्षणिक वेळ काढण्याचा प्रकार सुरू आहे. कमी मुलांची पटसंख्या असलेल्या शाळेचा दर्जा चांगलाच उंचावला पाहिजे, पण तसे होत नाही. कुणीही अंगाला लावून घेत नसल्यामुळे जि.प. शाळेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.डिजिटल शाळेमुळे विद्यार्थ्यांना कलागुण, कौशल्य चांगले अवगत होवून खेळीमेळीच्या वातावरणात चांगले शिक्षण होईल, अशी शासनाची संकल्पना होती. तालुक्यातील बहुतेक शाळांचे डिजिटल शाळेत रुपांतर करण्यात आले. काही शाळेतील डिजिटल साहित्य शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. काही शाळेत वीज जोडणी नसल्यामुळे संच बंद पडल्याचे चित्र दिसत आहे. बहुतेक शाळांचे शिक्षक गोंदिया, भंडारा, जवाहरनगर, अर्जुनी-मोरगाव, देवरी, गोरेगाव, लाखांदूर येथून ये-जा करतात. मागील एका वर्षापूर्वी तर काही हुशार शिक्षकांनी अपडाऊन करण्याच्या सोयीसाठी तालुक्यातील रस्त्यावरच्या शाळा बदली करुन घेतल्याचे दिसते. सडक-अर्जुनी, कोहमारा बसस्थानकावर कर्मचाºयांची गर्दी दिसून येते.
शिक्षण विभागाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:32 IST
शिक्षण विभागाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे.
शिक्षण विभागाचा खेळखंडोबा
ठळक मुद्देइंग्रजी शिक्षणाकडे कल : जि.प. शाळांतील पटसंख्येला गळती, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष