सचिन पाटील : खेळामुळे साहस, संघर्ष, नेतृत्व, समन्वय व आत्मविश्वास येतो अर्जुनी-मोरगाव : शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच खेळ हा महत्वाचा भाग आहे. विद्यार्थी शालेय जीवनात एकही खेळ खेळला नाही तो विद्यार्थीच नव्हे, खेळामुळे मनुष्याच्या अंगी शिस्त साहस, धैर्य, सहयोग, बुध्दी, चातुर्य, संघर्ष, नेतृत्व, समन्वयता व आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो. या गुणामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलते, असे प्रतिपादन अर्जुनी-मोरगावचे नायब तहसीलदार सचिन पाटील यांनी केले. सरस्वतती विद्यालय व क. महाविद्यालय, जीएमबी इंग्लिश हायस्कूल, सरस्वती विद्यानिकेतन प्राथ. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या क्रीडासत्राचा उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बल्लभदास भूतडा, अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, प्राचार्य तथा संस्थेचे सचिव अनिल मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, संयोजिका छाया घाटे, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, जीएमबी हायस्कूलचे प्राचार्य मुकेश शेंडे, संयोजक इंद्रनिल काशीवार, विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत ढोरे, धनश्री भागडकर उपस्थित होते. अतिथीच्या हस्ते देवी सरस्वती, शक्तीची देवता बजरंग बली प्रतिमेचे क्रिडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय स्तरावर सहभागी झालेल्या योगासन स्पर्धेतील विद्यार्थीनीनी मनोहारी योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केली. विविध खेळाची क्षणचित्रे सादर केली. याप्रसंगी अतिथींच्या हस्ते विभागीय व राज्यस्तरावर विविध खेळात नैपूण्य दाखवणाऱ्या विद्यार्थी, खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. स्वामी विवेकानंदानी शिकागो परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व केले. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व घडवणाऱ्या शिक्षकांना सन्मान द्यावा, असे प्रतिपादन अतिथी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असून त्याचा विकास करणे हे शिक्षकांचे नैतिक कर्तव्य आहे, असे अध्यक्षीय भाषणातून संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा म्हणाले. क्रीडा सत्रात रस्सीखेच खेळात रेडहाऊस अजिंक्य ठरला. खोखो, कबड्डी, डॉजबॉल, धावणे स्पर्धा, व्हॉलीबॉल, लांब उडी इत्यादी खेळाचे सामने होणार आहेत. संचालन व आभार क्रीडा शिक्षिका माधुरी पिलारे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा.अरविंद कांबळे, बन्सोड, अर्चना गुरनुले, एनएनएस पथक, आर.एस. व स्काऊट-गाईड पथकाचे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
खेळांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते
By admin | Updated: December 26, 2016 00:56 IST