कृषी पर्यवेक्षकाचे दबावतंत्र : माहिती अधिकाराची होतेय पायमल्लीकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले. ही धक्कादायक बाब समोर आली असून आजही त्यांना पुराव्याची गरज आहे, यावर शेतकरी ठाम आहेत.बरबसपुरा येथील रहिवासी माणिकराव यादोराव कटरे या शेतकऱ्याच्या शेतात कोणतीही पूर्वसूचना, मंजुरी किंवा स्वाक्षरी न घेता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भात खाचरचे काम करण्यात आले. या शिवारात शेतकऱ्याची पूर्व मंजुरी घेण्यात आली नाही. शेतात दोन ते तीन तास कामे करून शेताच्या बांध्यात बिघाड झाला. आपल्या शेतजमिनीतील काम व बिघाड झाल्याचे अनेक अर्ज माणिकराव कटरे या शेतकऱ्याने दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी माहिती अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रपत्र-अ द्वारे स्वत:च्या गटात भात खाचर कामाची व लागून असलेल्या गटाची सविस्तर माहिती मागितली. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रभारी मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल आर. रहांगडाले हे बरबसपुरा येथील माजी पोलीस पाटील बंशीलाल रहांगडाले यांच्या घरी येवून माणिकराव कटरे यांना बोलावून दबावतंत्राचा उपयोग केला. तसेच आपण माहिती मागितली ती पाहली, त्यावरून समाधान झाले, असे जबरन लिहून मागितल्याचे माणिकराम कटरे यांनी सांगितले. आपल्याला कोणतीही माहिती किंवा रेकार्ड दाखविण्यात आले नाही. आपल्या शेतासंबंधी आणि लगतच्या गटासंबंधी भात खाचर कामाचे रेकार्ड आपल्याला हवे आहेत, अशी ठाम भूमिका कटरे यांनी घेतल्याचे सांगितले. आपण समाधानकारक असल्याचे लिहून कसे दिले, असे कटरे यांना विचाऱ्यावर त्यांनी सांगितले की, अजून कामे पूर्ण झाली नाहीत. ती कामे करायची आहेत, असे बोलल्याने आपण लिहून दिले. तसेच रात्रीचे जागरण होते, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बरोबर नव्हती, असे ते म्हणाले. आपल्या गटासंबंधी माहिती मिळण्यावर आपण ठाम आहोत. कृषी पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले यांनी माझ्याकडून समाधान झाल्याचे लिहून मागितले आणि ते मी दिले, ते मान्य करण्यात येवू नये. आपण मागितलेली माहिती पुराव्यानिशी आपल्याला हवी आहे. दिलेले लेखी पत्र रद्द समजण्यात यावे व तात्काळ माहिती देण्यात यावी, असेही कटरे म्हणाले. दबावतंत्राचा उपयोग करून आपल्याकडून जबरन समाधानपत्र लिहून घेण्याचे आले, याची तक्रार आपण वरिष्ठ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला करणार. तसेच शेतीच्या कामात अपहार करण्यात आल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्याकडून जबरीने लिहून मागितले समाधानपत्र
By admin | Updated: March 17, 2016 02:33 IST