पोलिसांच्या समस्या सुटणार : प्रलंबित तक्रारी व निपटाऱ्याची माहिती देणार गोंदिया : पोलीस दलातील कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे कामकाज जलद गतीने व्हावे, यासाठी पोलीस महासंचालकांनी १ आॅक्टोबर रोजी समाधान हेल्पलाईन सुरू केली. पोलिसांची प्रलंबीत कामे करण्यासाठी या हेल्पलाईनचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी सभागृहात बैठकीचे आयोजन करून प्रशासकीय कामकाज शिघ्रतेने कसे होईल यावर मार्गदर्शन केले. गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस अधीकार-कर्मचारी तसेच सद्य स्थितीत कार्यरत पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना हक्काची रजा, वेतन निश्चिती, वेतनवाढ, वेतन पडताळणी, निवृत्ती वेतन, देय लाभ, शिट रिमार्कस, बक्षीसे, कसूरी, घरभाडे, पदोन्नती व वेल्फेअर संबधी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, यासाठी पोलीस विभागाने हेल्पलाईनवर तक्रार नोंदविण्याची व्यवस्था केली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने तक्रार केल्यास त्या कार्यालयातील लिपीक त्याच दिवशी त्या तक्रारीचे निवारण करेल किंवा त्या संबंधात काय कार्यवाही सुरू आहे याची माहिती संबंधीत तक्रारदाराला फोन वरून दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारी त्यांच्या केलेला निपटारा व प्रलंबीत असलेल्या तक्रारीची माहिती प्रत्येक महिन्याचा १० तारखेला पोलीस महासंचालकांना द्यावी लागणार आहे. पोलीस विभागातील कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व तक्रारीचे वेळीच निवारण करण्यासाठी या हेल्पलाईनची सेवा कर्मचारी,अधिकाऱ्यांना मिळणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, कार्यालय अधिक्षक संतोष गेडाम, उपनिरीक्षक श्रावण कुथे व इतर कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
कामकाजासाठी समाधान हेल्पलाईन
By admin | Updated: October 3, 2016 01:33 IST