लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती ‘बंजर’ होण्याची शक्यता बळावली आहे.किमान १० वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ््या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपुरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होता. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगी येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होती.शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता. पीक कसदार निपजत होते. त्यामुळे मनुष्यालाही कसदार अन्न मिळत होते.शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते. विशेष म्हणजे ते सर्व कसदार राहत होते. पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. खरीप आणि रबी पिकांवर कोणत्याही रोगांनी आक्र मण केले की, शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहेत.सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोज न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते. परिणामी शेतकरीही त्यांचा अति वापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा तोकडी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात वांगोडे तयार करून त्यात भाजीपाला लागवड करायचे. त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे. मात्र सध्या कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्ट झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकºयांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे.कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसानआता शेतकरी रासायनिक खतांचा वापर जादा प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता ‘बंजर’ होण्याची शक्यता बळावली आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतासोबतच दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचाही अत्यधिक वापर होऊ लागला आहे. या कीटकनाशकांमुळे शेतातील ज्या वनस्पती पिकांसाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे.
जमिनीतील पोषक तत्त्वे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:33 IST
आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून शेती पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जमिनीतील पोषक तत्त्वे गायब
ठळक मुद्देपरिणाम रासायनिक खतांचा : पशुपालन नामशेष अन् शेणखताकडे दुर्लक्ष