रावणवाडी : पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या किटकनाशकांचा दुष्परिणाम होवून पालेभाज्यांची पौष्टीकता पूर्णत: संपुष्टात येत आहे. अशा पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने एकप्रकारे ‘स्लो पॉयझन’च नागरिक ग्रहण करीत आहेत.किटकनाशक औषधांची फवारणी पालेभाज्यांवर केले जाते. त्यामुळे त्या पालेभाज्यातील विषारी घटक सेवनातून शरीरात प्रवेश करतात. यातून संपूर्ण शरीरच स्लो-पॉयझनच्या विळख्यात सापडले आहे. पिकाचे भरघोष उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यामार्फत पिकावर नाना प्रकारच्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु किटकनाशक औषधीच्या अति वापरामुळे किटकनाशक शरीरात भिनू लागले आहे. भाजीपाल्यातील जीवनसत्त्व व मानवी शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक नाश पावतात. किटकनाशकांच्या फवारणीमुळे संपूर्ण भालेभाज्या विषारी बनल्या आहेत. शेतकरी पालेभाज्यावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी स्वत:च्या मनाप्रमाणे वाट्टेल त्या किटकनाशक औषधीची फवारणी मोठ्या प्रमाणात करतात. एखादी किटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर नेमक्या याच औषधाची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणाऱ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे मोठाले फॅन्सी होर्डिंग्स, फलक व वॉल पेंटिंग ठिकठिकाणी लागलेल्या आढळतात. मात्र या कंपन्यांच्या जाहिरातीमागील सत्यता कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. सद्यस्थितीत बाजारात बोगस कंपन्यांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मात्र हा गंभीर प्रकार समजून घेण्यासाठी शासनाची तपास यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. बोगस कंपनीच्या घातक किटकनाशकाबद्दल जनतेत जाणीव निर्माण करून देण्याची आता गरज आहे. कृषी कार्यालयाकडून वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन केले जात नाही. अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती औषध किती वेळा व किती प्रमाणात वापरावी याची जाणीव नाही. औषध उत्पादकही त्या औषधांना विषारी करतात. शेतकरी अशा औषधांची फवारी पिकावर करतात. असा प्रकार चोहीकडे सुरू आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देवून रासायनिक खताचा व विषारी किटकनाशकांचा भरमसाठ उपयोग करीत आहेत. हा प्रकार पालेभाज्यांसाठी व इतर पिकांसाठी अत्यंत घातक असून मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. अशा पालेभाज्यांची भाजी बाजारात राजरोसपणे खरेदी-विक्री व उपयोग केला जात आहे. नागरिकही हिरव्या पालेभाज्या पौष्टीक असतात म्हणून मोठ्या आवडीने खरेदी करतात. मात्र कृषी विभागाला सक्रिय करण्याची आज गरज आहे. (वार्ताहर)
अनेक पालेभाज्यांतून मिळतेय ‘स्लो पॉयझन’
By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST