फटका : गुणवंतांची परवडदिलीप वाघमारे - बिजेपारमाजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नवोदय विद्यालयाची स्थापना देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय यानुसार झाली. ही निवासी शाळा गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना उच्च व शहरातील नामवंत शाळेच्या तोडीचे शिक्षण देण्यासाठी अस्तित्वात आली. परंतू भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी अजूनही एकच नवोदय विद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सन १९८६ मध्ये पहिले प्रायोगिक तत्वावरील जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्राच्या अमरावती व राजस्थानच्या झंझर येथे सुरू केले होते. या यशस्वी प्रयोगानंतर भारताच्या सर्व राज्यात प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय स्थापन करण्याचे लक्ष्य भारत सरकारच्या मानव विकास विभागाव्दारे ठेवण्यात आले. यात फक्त तामीळनाडू हे एकच असे आहे की त्यात नवोदयच्या शाळा उघडण्यास तेथील राज्य सरकारने विरोध केला. त्याचेही कारण केंद्र सरकारकडून तामीळ लोकांना हिंदी जबरदस्ती थोपविण्यात येईल असा त्यांचा तर्क होता. प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय या धोरणानुसार त्यावेळच्या संयुक्त भंडारा जिल्ह्याकरिता नवेगावबांध येथे शाळा सुरू करण्यात आली. परंतु १९९९ मध्ये जिल्ह्याची विभागणी केल्याने गोंदिया जिल्हा नवीन जिल्हा म्हणून उद्ययास आला. परंतु या जिल्ह्याला अगोदरच अस्तित्वात असलेली नवेगावची शाळा मिळाली. नवेगाव-गोंदिया जिल्ह्यात येत असल्यामुळे आपोआपच शाळा मिळाली. परंतु भंडारा जिल्ह्यासाठी वेगळे नवोदय विद्यालय स्थापन करण्यासाठी नव्याने कसरत करावी लागली. संपूर्ण प्रक्रिया पार करीत असतांना वरठी येथे जमिन व ठिकाण मंजूर झाल्याचे कळले, परंतु तिथे आजपर्यंत शाळेच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ झाला नाही. त्यामुळे अजूनही भंडारा जिल्ह्याचे विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव येथेच प्रवेशत घेतात. प्रत्येक वर्षी पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परिक्षा घेवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्याना यात तोटा आहे. जर त्वरीत भंडारा जिल्ह्याची जवाहर नवोदय वेगळी करून त्यांना तेथील जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिल्यास दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्याना ८०-८० चा वेगळा कोटा मिळेल. यात अजून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने त्यांच्या स्वप्नाची पूर्ती होऊन त्यांचे आयुष्य सुधारेल या विषयावर जिल्ह्याच्या खासदारांनी स्वत: पुढाकार घेऊन भंडारा जिल्ह्याच्या नवोदय स्थापनेसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दोन जिल्ह्यांसाठी एकच नवोदय
By admin | Updated: September 2, 2014 23:51 IST