आमगाव (गोंदिया ) : संघटनात्मक जबाबदारी वाटपावरून नागपूर येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच सर्वच नाराज शिवसैनिकांची भेट घेणार असून, त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचे सांगितले.
आमगाव येथे बुधवारी (दि. १३) शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयाेजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. नागपूर येथे अलीकडेच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिल्याने व पक्षातील निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेनेत असंतोष उफाळून आला आहे. यावर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नसून, त्यांची नाराजी लवकरच दूर केली जाईल, असे सांगितले. गोंदिया जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेऊ घातल्या असून, याच दरम्यान त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावेळी त्यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील सौदंड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी शिवसेना विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, गोंदिया भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, आमगाव विधानसभा संपर्कप्रमुख ललित मुथा, नरेश बुरघाटे, प्रवीण शिंदे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, जिल्हा समन्वयक पंकज यादव, जिल्हा संघटक सुनील लांजेवार उपस्थित होते.