दिलीप चव्हाण - गोरेगावचिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या त्रासापासून कायमची मुक्ती व्हावी म्हणून येथील शिक्षक एम.पी. शेख यांच्या कल्पनेतून येथील जिल्हा परिषद शाळेत ‘दप्तराचे ओझे कमी करा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथे ५ ते ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी येथील शिक्षकांच्या कल्पनेतून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. येथील ५ वी ते ८ वीचे विद्यार्थी शाळेत पुस्तके आणत नाही तर शाळेतच तीन विद्यार्थ्यांमागे एका पुस्तकाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. एका टेबलवर तीन विद्यार्थी बसविले जाते व तीन विद्यार्थ्यांमागे शाळेकडून एक पुस्तक पुरविली जाते. शाळेच्या वर्गखोलीत एका कपाटाची व्यवस्था करण्यात आली. या कपाटात सर्व विषयांच्या विद्यार्थी संख्येनुसार पुस्तके उपलब्ध आहेत. तासिका निहाय विद्यार्थ्यांना पुस्तके पुरविली जातात व तासीका संपल्यानंतर ‘ती’ पुस्तके पुन्हा कपाटात ठेवली जातात. असा नित्यक्रम या शाळेत सध्या सुरू आहे. शासनाने मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. शासनाच्या या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. यातील चांगली, नवी पुस्तके येथील शैैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मागून घेतात, पुढे हिच पुस्तके शाळेत जमा करून विद्यार्थ्याना अभ्यासासाठी दिल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करण्यांसाठी व घरी अभ्यास करण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना पुस्तके आणण्याची गरज पडत नाही. येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या शैक्षणिक वर्षापासून सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहे. या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाल्याचे चित्र आहे. येथील विद्यार्थी फक्त वह्या शाळेत घेऊन येतात. एका टेबलवर तीन विद्यार्थी बसून ज्ञानार्जन करतात. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक एम.पी. शेख, वर्गशिक्षक माधुरी गजबे, जी.एच. जुगनाके, एस.व्ही. पोटफोडे आर.सी. बिरनवार, पी.के. पटले, आय.वाय. रहांगडाले, के.एस. बिसेन परिश्रम घेत आहेत.
दप्तराचा भार हलका करण्यासाठी लढविली शक्कल
By admin | Updated: February 9, 2015 23:14 IST