भंडारा : वनांचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावर महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेने भंडारा उपवनसंरक्षक अतुल वर्मा यांच्याकडे दाद मागितली. यातील अनेक समस्यांवर त्यांनी तोडगा काढल्याने वनकर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे केंद्रीय संघटक ललीतकुमार उचिबगले, भंडारा जिल्हाध्यक्ष सैय्यद इरशाद महमूद अली, एम.जे. नंदूरकर, वनमजूर संघटनेचे केंद्रीय सदस्य संपतराव खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष राजू झंझाड यांच् या नेतृत्वात उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. यावर वर्मा यांनी अनेक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तर काही समस्या वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश दिले. वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांमध्ये जंगलामध्ये काम करीत असताना बीट गार्डला मदतनिसची गरज आहे. अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या बिट गार्डला दोन मदतनिस तर सर्वसाधारण क्षेत्रातील बिटगार्डला एक मदतनिस देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. सोबतच वनकर्मचाऱ्यांना गणवेश शिवण्यासाठी ५०० रुपये वाटप करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच सर्व वनकर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेच्या आत देण्याचे शिष्टमंडळाला कबूल केले. वनमजुरांना कायम प्रवास भत्ता १५०० रुपये देण्याचेही अभिवचन यावेळी त्यांनी दिली. तपासणी नाक्यावर शौचालय नसल्याने महिला कर्मचाऱ्यांची दैनावस्था होत होती. त्यामुळे सर्व नाक्यांवर शौचालय बांधणीच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. बऱ्याच वनकर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता मिळत नव्हता. ते थकीत असल्याने ते काढून देण्याचे निर्देशही संबंधित लिपिकाला दिले.
वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा
By admin | Updated: August 29, 2016 00:14 IST