व्यथा : शासन लक्ष देणार काय?पहेला : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. महागाईच्या काळात कर्मचारी, अधिकारी हे वेतन व भत्ते वाढीसाठी चळवळ उभारून आपल्या मागण्या शासनाकडून पदरात पाडून घेतात. परंतु गावाचा विकास करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना महिन्याकाठी मासिक सभेचा केवळ २५ रूपये भत्ता दिला जातो. ही शासनाकडून लोकप्रतिनिधींची एक प्रकारे थट्टाच आहे.ग्रामपंचायत सदस्य हे समाजसेवा करण्यासाठी नागरिकांनी दिलेले पद आहे. गावाचा विकास करण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे सदस्य सहकार्य करतात. तसेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे जावून नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. एवढे असूनही ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला उपस्थित राहण्याकरीता २५ रूपये भत्ता महिन्याकाठी मिळतात. सरपंचाना ४०० रूपये मानधन देण्यात येते. अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी लागणारा प्रवास खर्च, कागदपत्राची जुळवाजुळव यांच्या खर्चाचा अंदाज घेतल्यास यात मोठा खर्च येतो. यात काही सदस्यांना तर स्वत: जवळून खर्च करावे लागतात. सर्वच तालुक्यात बहुतांश ठिकाणी गट ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीमधील सदस्यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत असलेल्या गावात जावे लागते. त्याचा प्रवासभत्ता अदा करण्यात येत नाही. यामध्ये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी असतात व समस्या विचारात घेता महिन्याकाठी एकाच सभेचे आयोजन केले जाते. त्या सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना महिन्याकाठी फक्त २५ रूपये मिळतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला सदस्य उपस्थित राहू शकत नाही. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे नवीन रोटेशनमुळे यात गरिबाला गरिब व्यक्ती सुद्धा सरपंच, तथा सदस्य होत आहेत. तेव्हा त्यांना आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरची मजुरी केल्याशिवाय गत्यंतर नाही. (वार्ताहर)
ग्रामपंचायत सदस्यांची सेवा २५ रूपयांमध्ये
By admin | Updated: November 7, 2015 01:55 IST