लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते. त्यांना संरक्षणासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश ए.बी.तहसीलदार यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या योजना यावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्र मात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी वासंती मालोदे, अॅड. बिना बाजपेई, आशा ठाकुर, नामदेव कोसलकर उपस्थित होते.न्यायाधीश तहसीलदार पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना न्याय पाहिजे असल्यास त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे पालन-पोषण त्याचा मुलगा करीत नसेल तर त्यांनी कलम १२५ (३) अन्वये मुलाकडून पोटगी घ्यावी व प्रकरण न्यायालयात दाखल करावे असे सांगितले. न्या.श्रीमती मालोदे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात नोकरी करीत असतील व आई-वडील म्हातारे घरी राहतात व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. मुलांमध्ये आई-वडीलांप्रती आत्मीयता कमी होते. त्यांना आधार नसतो. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना त्या मुला-मुलींच्या विरोधात प्रकरण दाखल करता येते असे सांगितले.अॅड. बाजपेई म्हणाल्या, व्यक्ती हा विचाराने कमजोर होत नाही तर तो शरीराने कमजोर होतो.आशा ठाकुर म्हणाल्या, स्वत:च्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांवर त्याच्या मुलाचे नियंत्रण व प्रेम असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मनाप्रमाणे त्यांच्या मुलांनी वागले तर दुरावा निर्माण होत नाही. यावेळी न्यायीक अधिकारी, वकील, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एस.जी.कान्हे, जी.सी.ठवकर, श्रीमती डी.ए.थोरात. एल.पी.पारधी, प्रेक्षिक गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरु दयाल जयतवार यांनी सहकार्य केले. संचालन व आभार अॅड. मंगला बंसोड यांनी मानले.
ज्येष्ठ नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:28 IST
आजची पिढी ही कुटूंबातील, समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत असल्याचे दिसून येत नाही. त्यांना कुटूंब सोडून वेगळे किंवा वृध्दाश्रमात राहावे लागते.
ज्येष्ठ नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा
ठळक मुद्देन्या.तहसीलदार : कायदेविषयक जनजागृती शिबिर