गोंदिया : आपल्याला पुन्हा कामावर घेण्यात यावे, या मागणीसाठी १९ जानेवारीपासून बिरसी येथील सुरक्षारक्षकांनी विमानतळ गेटसमोर साखळी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला तेरा दिवसांचा काळ उलटला तरी जिल्हा व विमानतळ प्रशासनाने या आंदोलनाची अद्यापही दखल न घेतल्यामुळे या आंदोलनकर्त्यांनी सोमवारपासून अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
तेरा वर्षे काम करूनही कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता विमानतळ प्रशासनाने स्थानिक असलेल्या गरीब सुरक्षारक्षकांना कामावरून पूर्णतः बंद केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. वर्ष २००७ मध्ये याच विमानतळ प्रशासनाने स्थानिक नागरिकांना या प्रकल्पात अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, यानंतर घूमजाव करीत सर्व सुरक्षारक्षकांना कामावरून बंद केले आहे. या सुरक्षारक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. यादरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, शनिवारी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पंकज यादव, सुनील लांजेवार यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे खासदार तथा विमानतळ विकास व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी तीनदा सभेसाठी वेळ देऊनही त्यांनी येथे येण्याचे टाळले. त्यामुळे स्थानिक नागरिकांत त्यांच्याविरुद्ध रोष दिसून येत आहे. आता सुरक्षारक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या अन्नत्याग आंदोलनात जर सुरक्षारक्षकांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्यास जिल्हा व विमानतळ प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.