गोंदिया : थकबाकीदारांना दणका देत त्यांच्याकडून मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या पथकाने आता थकबाकीदारांची दुकान गोदाम सील केल्याची कारवाई सोमवारी (दि. २५) केली. विशेष म्हणजे, या कारवाईसोबतच आणखी २ दुकानांवर कारवाई केली जाणार होती. मात्र, संबंधितांनी मालमत्ता कर भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
यंदा मालमत्ता करवसुली करताना कुणाचीही गय करायची नाही, असे निर्देश मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिले आहे. यामुळे करवसुली पथक धडाक्यात कामाला लागले असून आतापर्यंत कित्येक दुकान, मोबाईल टॉवर, बॅंका व रहिवासी मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे. यातूनच कोट्यवधीची वसुली करण्यात पथकाला यश आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२५) पथकाने शहरातील गंज वॉर्ड येथील सरस्वती भिकारीलाल जायस्वाल यांचे दुकान व गोदाम सील केले आहे. त्यांच्याकडे सन १९९३ पासून एक लाख ८३ हजार ३७३ रुपयांची थकबाकी आहे.
तर यासोबतच प्रकाशचंद, मधुसूदन, विष्णुकुमार, महेशकुमार , हरिशंकर पुरोहित यांच्यावर अभिपत्राची अंमलबजावणी करण्यात आली तसेच आणखी २ दुकानांचे शटर पाडण्यात आले होते. मात्र संबंधितांनी मालमत्ता कराचा भरणा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली.
-----------------------
लिलावाची तयारी झाली सुरू
नगरपरिषदेने मालमत्ता कर भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार, असे स्पष्ट केले आहे शिवाय यासाठी ई-लिलाव पोर्टल तयार केले जात आहे. त्यादृष्टीने करवसुली पथक आपल्या मोहिमेवर जात असताना थकबाकीदारांच्या मालमत्तांचे छायाचित्र काढत असल्याची माहिती आहे म्हणजेच, लिलावाची गरज पडल्यास हे छायाचित्र पोर्टलवर अपलोड केले जाणार आहे.