लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद मालमत्ता कर विभागाकड़ून इमारतींना सील करण्याचा धडाका सुरू असतानाच सोमवारी (दि. ८) कर वसुली पथकाने शहरातील आणखी २ रहिवासी इमारतींना सील ठोकले. त्यामुळे पथकाचा मोर्चा आता सर्वसामान्य थकबाकीदारांकडे वळल्याचे दिसत असून, वसुलीसाठी रहिवासी इमारती सील करण्याची कारवाई केली जात आहे.
सोमवारी कर वसुली मोहिमेंतर्गत पथकाने माताटोली परिसरातील राजेंद्र वॉर्ड येथील रहिवासी भीमराव टिकाराम खानोरकर यांच्याकडे धडक दिली. त्यांच्याकडे सन १९९३-९४पासून ९१ हजार ९८६ रूपयांची मालमत्ता कराची थकबाकी असून, त्यांनी कर भरण्याची तयारी दाखवली नाही. तर शेवता मस्के यांच्याकडे धडक दिली असता, त्यांनीही सन १९९३-९४पासून असलेली २२ हजार रूपयांची थकबाकी भरण्याची तयारी दाखवली नाही. त्यामुळे पथकाने दोघांच्याही घराला सील केले आहे. विशेष म्हणजे, पथकाकडून मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ता सील केल्या जात असताना आता सोबतच घरातील सामानाची यादीही तयार केली जात आहे. मालमत्ताधारकाने कराचा भरणा न केल्यास संबंधितांच्या सामानाची जप्ती केली जाणार आहे.
---------------------------------
आयकर विभाग कार्यालयाला दिली ३ दिवसांची मुदत
शहरातील आयकर विभाग कार्यालयाकडे सन २०१५-१६पासून पाच लाख ६४ हजार रूपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. याबाबत कर विभागाकडून या कार्यालयाला वारंवार कळविण्यात आले आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडून कराचा भरणा करण्यात आलेला नाही. परिणामी आता कर विभागाने त्यांना जप्तीची नोटीस बजावली असून, कर भरण्यासाठी ३ दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कराचा भरणा न केल्यास कार्यालयाला सील केले जाणार असल्याची माहिती कर अधिकारी तथा उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी दिली.