गोंदिया : मालमत्ता कर थकबाकीदारांना एकावर एक दणके देत असतानाच मालमत्ता कर वसुली पथकाने श्री टॉकीज चौकातील अख्खी इमारतच बुधवारी (दि. ३) दुपारी सील केली. विशेष म्हणजे या इमारतीत असलेल्या ५ दुकानांनाही सील ठोकण्यात आले आहे. या इमारतधारकांवर १.९२ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मालमत्ता कर वसुली करताना कुणाचीही गय करू नका, असे मुख्याधिकारी करण चव्हाण यांचे वसुली पथकाला आदेश आहेत. यामुळे पथक जोमात कामावर लागले असून, आतापर्यंत ४० टक्क्यांच्या घरात कर वसुली झाली आहे. यासाठी पथकाने आतापर्यंत कित्येक बँका, मोबाइल टॉवर, एटीएम, दुकान, रहिवासी इमारत आदींना सील ठोकले आहे. यातच बुधवारी (दि. ३) कर अधिकारी विशाल बनकर व पथकाने श्री टॉकीज चौकातील परेश गोविंद मिरानी व दुर्गेश प्रफुल्ल मिरानी यांच्या इमारतीत धडक दिली. त्यांच्यावर सन २००३ पासून एक लाख ९२ हजार ५८३ रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. असे असतानाही मिरानी यांनी पथकाला कर भरण्यास तयारी दर्शवली नाही. यावर पथकाने मिरानी यांच्या इमारतीचा मुख्य प्रवेश मार्ग तसेच इमारतीत असलेल्या ५ दुकानांनाही सील ठोकले.
-----------------------
फ्रेंड्स ऑटोमोबाइलवरील कारवाई टळली
मिरानी यांच्या इमारतीला सील ठोकल्यानंतर पथकाने मरारटोली येथील फ्रेंड्स ऑटोमोबाइलवर धडक दिली. त्यांच्यावर सन २०११ पासून मालमत्ता कराची थकबाकी असल्याने त्यांना अधिपत्र बजावण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी कारवाई करण्याची पथकाची तयारी होती. मात्र, त्यांनी मालमत्ता कर भरल्याने ही कारवाई टळली.