बिरसी-फाटा : २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा सुरू होत असून शिक्षणमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत . २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व विद्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार शाळा प्रशासनाने तयारी केली आहे. आता वर्ग १ ते ४ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश केव्हाही येऊ शकतात ही शक्यता लक्षात घेत तिरोडा तालुक्यातील बहुतेक शाळा तयारीला लागल्या आहेत. त्यामध्ये चोरखमारा शाळेत रंगरंगोटी व सफाईला सुरुवात झाली आहे.
वर्ग ९ ते १२ पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. याला जवळजवळ २ महिने कालावधी होत असताना आतापर्यंत फक्त ३७ टक्केच विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. तर ६३ टक्के विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे आता कोरोनाची धास्ती असताना आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवायचे किंवा नाही याची चिंता पालकांना सतावत आहे. मात्र शाळा सुरू होत असल्याने आता किती विद्यार्थी जातात हे दिसेलच.
प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा सुरू होत असून शिक्षणमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व खासगी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या व तयारी पुर्ण झाली आहे. त्यात वर्ग १ ते ४ पर्यंत सुरू करण्याचे पत्र ऐनवेळेवर आले तर शाळांचे निर्जंतुकीकरण कसे होणार यासाठी आतापासूनच शिक्षण विभागाने शाळांना निर्जंतुकीकरण करण्यास सूचना केली आहे. आजघडीला शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करणे तसेच शाळा निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांची कोरोना चाचणी होणार असून पोषक वातावरणात शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तिरोडा तालुक्यातील ग्राम चोरखमारा येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. एफ. रहांगडाले यांनी इमारतीच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करून परिसर स्वच्छ केला आहे.