पांढरी : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २७ नोव्हेंबर २०१० ला राज्यातील सर्व शाळांना सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी ठेवण्याचे आदेश काढले होते. शाळा इमारतीच्या परिसरात ज्वलनशिल पदार्थ ठेवण्यावर प्रतिबंध लावला होता. परंतु तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही एकाही शाळेत अग्निशमन यंत्राची व्यवस्था करण्यात आलेली नाही.सुरक्षेच्या या अनास्थेमुळे शाळा व्यवस्थापकाव्दारे शासनाच्या निर्देशाची अवहेलना होत आहे. तसेच प्रशासनाव्दारेही याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निर्देशनुसार, नवीन शाळांच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत: सुरक्षेचे मापदंड लक्षात घेवून केले जाते. तसेच नॅशनल बिल्डींग उपायाचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र होणे गरजेचे असते. सर्व शाळांत अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कमीत कमी दोन व्यक्तींना असावे व अग्निशमन यंत्राजवळ त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट अक्षरात लिहीलेले असावे. तसेच सर्व शाळांत प्रथमोपचार पेटी ठेवण्यात यावी, गट शिक्षणाधिकाऱ्याव्दारे प्रशिक्षण कार्यक्रमात मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जावे, पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात यावे अशा तरतुदी आहेत. शासनाच्या निर्देशानुसार बालवाडी व पूर्व माध्यमिक शाळा इमारतीच्या खालच्या मजल्यावर असायला हवी. मात्र शासनाव्दारे जाहीर दिशानिर्देशाचे पालन जिल्ह्यात कुठेही होत असल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात एकूण १ हजार ७० प्राथमिक, २९८ उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय ३९ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व २५ ते ३० महाविद्यालये आहेत. या सर्व शाळेत आगीपासून वाचण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील अनेक शाळेत अग्निशमन यंत्र तर दूर, प्रथमोपचार पेटीसुध्दा उपलब्ध नाही. शासनाच्या आदेशाची शाळा प्रशासनाव्दारे उपेक्षाच केली जात आहे. असे असतानाही शिक्षण विभागाव्दारे अद्यापही कोणत्याही शाळा प्रशासनावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळा इमारतीचे बांधकामही शासनाव्दारे देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून केले जात नाही. शाळा व्यवस्थापनाकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ केला जात आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यातील शाळांत अग्निशमन यंत्रच नाहीत
By admin | Updated: November 8, 2014 22:39 IST