सालेकसा : आपला पाल्य आवश्यकतेपेक्षा जास्त ‘पॉकेट मनी’ मागत आहे? मग जरा सावधान! शालेय विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याचे प्रलोभन देऊन चक्क जुगाराच्या नादी लावण्याचा प्रकार शहरात सुरू आहे. काही शाळांच्या परिसरासह शहराच्या मध्यभागातील सुभाष गार्डनमध्ये हा जुगार चालत असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले.तीन सीडी (कॉम्पॅक्ट डिस्क) घेऊन त्या इकडून-तिकडे फिरवून विशिष्ट सीडी ओळखायची आणि ती सीडी ओळखली तर जितके पैसे लावले, त्याच्या दुप्पट पैसे परत घ्यायचे अशा या खेळाला जुगाऱ्यांच्या भाषेत ‘तीन बिल्ले’ म्हणून ओळखले जाते. अगदी कोणतेही भांडवल न लावता आणि कुठेही सहजपणे रस्त्याच्या कडेलाही खेळता येईल असा हा जुगार सध्या शहरात फोफावत आहे. गंभीर बाब म्हणजे अगदी सातवीपासून तर बारावीपर्यंतचे विद्यार्थी सुद्धा या जुगाराच्या नादी लागत आहेत.सुरूवातीला कुतूहल म्हणून आणि मित्रांच्या सांगण्यावरून विद्यार्थी हा जुगार पहायला जातात. नंतर आई-वडिलांकडून पॉकेटमनी म्हणून मिळालेल्या पैशातून काही पैसे या जुगारावर लावतात. समोरचा व्यक्ती नवीन आहे असे पाहून जुगार खेळविणारा त्याला पैसे कमवू देतो. त्यातून त्याला हाव सुटते आणि तो जुगार खेळविणाऱ्यांच्या कचाट्यात ओढला जातो. शेवटी स्वत:जवळचे सर्व पैसे तो गमावून बसतो.शहरातील काही शाळांच्या परिसरात व छोटा गोंदिया परिसरात या ‘तीन बिल्यां’चा धुमाकूळ सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुभाष गार्डनमध्ये विशिष्ट वेळेला हा जुगार चालतो. विशेषत: सुटीच्या दिवशी हा जुगार खेळण्यासाठी विद्यार्थी गर्दी करताना दिसतात. कधी शाळेच्या नावावर, तर कधी मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त करून अनेक विद्यार्थी आई-वडिलांकडून पैसे मिळवितात. हे पैसे ते जुगारात उडवितात. एक बोली १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंतची असते. त्यामुळे काही वेळातच मुले २०० ते ५०० रुपये गमावून बसतात. एखाद्या विद्यार्थ्याने चुकून पैसे कमविलेच तर त्या पैशातून मित्रांना पार्टी देण्याचा आनंद ते लुटतात. याला पोलिसांनी आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थी खेळतात जुगार
By admin | Updated: August 5, 2014 23:30 IST