वाचनालयांत मात्र अभाव : शाळांमधून वाढीस लागतेय बालकांमध्ये पुस्तकांची गोडीगोंदिया : जिल्ह्यातील शाळकरी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्यावर बाल साहित्यातून चांगले संस्कार घडविण्यासाठी आता शाळांमधील ‘वाचन कट्टा’ मोठे योगदान देत आहे. या कट्ट्यावर त्या शाळकरी मुलांना वाचायला मिळत असलेली बाल साहित्यांची पुस्तके त्यांच्यात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. यासोबतच जिल्ह्यातील अ आणि ब वर्ग वाचनालयांमध्ये बालकांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.गोंदिया जिल्ह्यात शासकीय अनुदानावर चालणारे १९४ ग्रंथालय आहेत. त्यापैकी अ वर्ग दर्जा असणारे २ तर ब वर्ग दर्जा असणारे २० ग्रंथालय आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र बाल पुस्तके ठेवली आहेत. त्यात कॉमिक्स, प्रबोधन गोष्टींची पुस्तके, बाल कविता, कथा आणि मुलांना आवडतील अशी विविध पुस्तके आहेत. मात्र ग्रंथालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन बालकांनी पुस्तके वाचण्याचे किंवा ग्रामीण भागात असलेल्या क वर्ग ग्रंथालयांमधून बालकांची पुस्तके घरी नेऊन वाचण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे. मात्र आता शाळकरी विद्यार्थ्यांना अवांतच वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी बहुतांश शाळांमध्ये सुरू करण्यात आलेला वाचन कट्टा प्रभावी ठरत आहे. अनेक शाळांना दोन वर्षांपूर्वी ग्रंथालयांसाठी शासनाकडून निधी पुरविण्यात आला होता. मात्र आता शासनाकडून निधी देण्याऐवजी लोकसहभागातूनच हे काम करण्याचे सूचविले जात आहे. प्रत्येक गावात लोकसहभाग मिळणे शक्य नसून त्यामुळे अनेक अडचणी येतात, असे शिक्षक एल.यु. खोब्रागडे, डोंगरवार यांनी सांगितले. तरीही शक्य तितके प्रयत्न करून शिक्षकवृंद लोक सहभाग आणि आपल्या खिशातून बालकांसाठी विविध पुस्तके उपलब्ध करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
‘वाचन कट्ट्या’तून होतोय बालकांवर संस्कार
By admin | Updated: April 2, 2016 02:18 IST