थातूरमातूर कारवाई : गौण खनिजाच्या उघड चोरीकडे महसूल विभागाची डोळेझाकअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील पलटूदेव पहाडावर मोठ्या प्रमाणावर झालेले अवैध उत्खनन हा उघडपणे चोरी झाल्याचा पुरावा असताना या प्रकरणात ठोस कारवाई झालेली नाही. थातूरमातूर चौकशी करून हे प्रकरण गुंडाळण्यात आले. त्यामुळे महसूल विभाग व गिट्टी तस्करांचे साटेलोटे किती घट्ट आहेत हे स्पष्ट होत आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सचित्र वृत्तांत प्रकाशित केला. तलाठ्याने पंचनामाही केला. नंतर तहसीलदारांनीही भेट दिली. त्यामुळे सदर गिट्टीमाफियांवर मोठा दंड आकारून त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता तेच अधिकारी ‘काय पुरावा आहे’ असे सांगून या प्रकरणातून नामनिराळे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या गिट्टीचे मूल्य अवघे ३७ हजार असून त्याचा लिलाव ५ आॅक्टोबर रोजी होणार आहे. मात्र इतके दिवस बिनबोभाटपणे सुरू असलेल्या या प्रकाराचे मूल्यमापन करण्याकडे अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या खोलात शिरण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला दिसत नाही.नवेगावबांध येथील पलटू देवस्थानासमोर असलेल्या शासकीय पहाडावर गट क्रमांक.१२६२/१ मध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे गिट्टी व मुरूम उत्खनन सुरू आहे. हा गोरखधंदा परिसरातीलच गुत्तेदार करीत आहेत. याची कल्पना नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार सुरू असणे शक्यच नाही असे गावकरी म्हणतात. पलटूदेव पहाडावर अवैध उत्खनन केलेले गिट्टीचे अनेक ढिग आहेत. हे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असतानाही तलाठी झलके यांना माहिती असू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या अवैध उत्खननाची माहिती ‘लोकमत’ने तलाठ्याला दिली. त्यानंतरच या सर्व प्रक्रियेला सुरूवात झाली. तलाठ्याने प्रस्तुत प्रतिनिधीसोबत प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. पंचनामा केला. परिसरात असलेल्या गुराख्यांना गिट्टी उत्खनन कुणी केले त्याचे नाव विचारले. त्यांनी नाव सांगितले. मात्र त्या व्यक्तीच्या नावे कुठलीही कारवाई केली गेली नाही. या स्थळाला तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनीसुध्दा भेट दिली. मात्र ती गिट्टी कुणाची? हे सांगणारा कुणीही नसल्याचे ते सांगतात. यावरून या प्रकरणाची बिजे किती खोलवर रुजलेली आहेत ते स्पष्ट होते. पहाडीवर आजवर अवैध उत्खनन झाले आहे. आजतागायत महसूल प्रशासनाने गिट्टी उत्खननाची दिलेली परवानगी व त्याद्वारे प्राप्त झालेला महसूल तसेच एकूण प्रत्यक्ष झालेले उत्खनन याचे मोजमाप झाल्यास या परिसरात शासनाच्या महसूलाला नेमकी किती झळ पोहोचली हे स्पष्ट होईल. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता आपण अस केल तर यात आपले आयुष्य निघून जाईल अशी बेजबाबदारपणाने वक्तव्ये केली जात आहेत. यातून एक प्रकारे शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याची मानसिकता यावरुन स्पष्ट होते. या प्रकरणात नवेगावबांध, बोंडे येथील एका इसमाचे नाव पुढे येत आहे. तेथील लोक उघडपणे त्याबद्दल बोलत आहेत. तलाठ्यासमोर हे स्पष्ट झाले असतानाही पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यास महसूल अधिकारी मात्र मागेपुढे का पाहात आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. जमिनीत गिट्टीचे साठे असलेल्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्या जागेवर वारंवारच्या उत्खननामुळे मोठमोठे खड्डे दिसून येतात. याला सुध्दा महसूल विभागाचे मूकसमर्थन असल्याचे बोलल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
गिट्टी उत्खनन प्रकरणात साटेलोटे
By admin | Updated: October 2, 2016 01:18 IST