गोरेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी लाखो रुपये खर्चून कर्मचारी वसाहत तयार करण्यात आली. मात्र, या वसाहतीत अद्यापही पाण्याची सोय नसल्याने या इमारतीचे हस्तांतरण करण्यात आले नाही. चार वर्षांपासून ही वसाहत रिकामी पडली आहे, तर ग्रामीण रुग्णालयात अद्यापही सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी एक ग्रामीण रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सोनी, चोपा, तिल्ली मोहगाव, कुऱ्हाडी, कवलेवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यांचे आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत.
गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पद २००६ पासून रिक्त आहे. या रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारिका कार्यरत आहे. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ १२ अग्निशमन यंत्र लागले आहेत. या ग्रामीण रुग्णालयात अद्यापही एक्सरे मशीन लावण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन एक्सरे काढावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. एक्सरे मशीन नसली, तरी एक्सरे टेक्निशियन मात्र येथे कार्यरत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे अद्यापही फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट झाले नसून, केवळ १२ फायर इस्टिंगशर लागले आहे. मात्र, ते अपुरे आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांना २४ सेवा देता यावी, यासाठी रुग्णालय परिसरालगत कर्मचारी वसाहत तयार करण्यात आली. मात्र, या ठिकाणी पाण्यासह इतर सुविधा नाही. त्यामुळे चार वर्षांपासून ही वसाहत धूळखात पडली आहे. क्वार्टरचे खिडक्या, दरवाजे, टाईल्स तुटलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ३ सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली, पण अद्यापही त्यांची नियुक्ती करण्यात आली नाही.
.......
१४ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त
येथील ग्रामीण रुग्णालयात मागील १४ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. हे पद अद्यापही भरण्यात आले नाही. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. हे पद भरण्यासाठी अद्यापही कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.
.....
- एक्सरे मशीनचा अभाव
- तालुुुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त
- सुरक्षा रक्षकांचा अभाव
- केवळ १२ फायर इस्टिंगविशर
- कर्मचारी वसाहत मोडकळीस