पालकमंत्र्यांचे दत्तक गाव : गावामध्ये विकासकामेच नाहीत लोकमत न्यूज नेटवर्क पांढरी : परिसरातील मुरपार/राम ते पळसगाव य ३ किमी. रस्त्याचे काम चार ते पाच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या रस्त्यात निकृष्ट दर्जाच्या गिट्टी वापरून व डांबरीकरणाचे काम झाल्यामुळे मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मुरपार/राम ते पळसगाव रस्त्याचे काम झाले त्यानंतर चार ते पाच वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या आलेल्या पहिल्याच पावसामुळे खड्यामध्ये पाणी साचले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व येथील जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना चिखलतून मार्ग काढावा लागतो. मुरपार/राम ते पळसगाव हा संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे नव्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतने वेळोवेळी तक्रार देवून सुद्धा कसल्याही प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नाही. या परिसरातील राजकुमार बडोले आमदार असताना मुरपार/राम व गोंगले ही दोन गावे त्यांनी दत्तक घेतली होती. तेव्हाही या गावामध्ये विकासाचे काम झाल्याचे बघायला मिळाले नाही. सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा त्यांनी घेतलेल्या दत्तक गावांची अवस्था अशी झाली असून त्यांना या दत्तक गावातील जनते विषयी किती आपुलकी आहे, असे या गावातील जनतेचे बोलले जात आहे. पालकमंत्र्याचे दत्तक गाव म्हणून गावामध्ये फलक लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे या गावाच्या रस्त्यांची चौकशी करुन नव्याने रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. या विषयी सडक अर्जुनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अभियनता एन.टी.निमजे यांच्याशी बोलले असता त्यांनी मुरपार/राम ते पळसगाव रस्त्याचे काम मंजूर झाले असून पावसाळा संपताच केले जाईल असे सांगीतले.
रस्त्याची झाली दयनीय अवस्था
By admin | Updated: June 24, 2017 01:58 IST