शारदा महाजन : पंचायत राज व महिला सबलीकरण चर्चासत्र सालेकसा : सृष्टीच्या निर्मीतीपासून तर समाज निर्मिती आणि राज्य निर्मिती सारख्या अनेक युगात्मक परिवर्तनात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरत राहिली म्हणून महिलांच्या कोणत्याही कामाला दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन नटवरलाल माणिकलाल दलाल (एनएमडी) कॉलेजच्या जेष्ठ प्राध्यापिका डॉ. शारदा महाजन यांनी केले. येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात पंचायत राज व्यवस्था व महिला सबलीकरण या विषयावर आयोजित व्याख्यानमाला व चर्चासत्रात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ललित जिवानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक डॉ. शारदा महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दिप्ती चौरागडे, महिला अध्यक्ष व सेवा केंद्र प्रभारी डॉ. उमावती पवार, पोलीस निरीक्षक मोहन खांदारे व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य महिला आयोजन मुंबईद्वारा प्रेरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एम.बी.पटेल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सरंक्षण अधिनियम २०१३ या कायदा अंतर्गत एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना महाजन यांनी, पीपीटीच्या माध्यमातून व्याख्यान देताना पंचायत राज व्यवस्था अंतर्गत महिलांसाठी उपलब्ध सुविधांमुळे महिलांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. उत्तरोत्तर महिलांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय दर्जा वाढत चालला आहे. अशात समाज निर्मितीसाठी महिलांची भूमिका महत्वाची ठरत असून येणाऱ्या काळात नवसृजनात महिलाही सारख्या जवाबदार राहणार आहे. म्हणून त्यांनी केलेली कामे योग्य दिशा देणारी ठरेल याचे भान ठेवणे सुध्दा अति आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जिवानी यांनी, महिलांनी आपल्या गुण स्वभावानुसार धैर्यवान, शीलवान, सहनशील व संघर्षशील होण्याची प्रेरणा देत महिला सक्षम तर समाज व देश सक्षम होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित इतर महिला प्राध्यापिकांनीही समयोचित मार्गदर्शन केले. संचालन श्रीकांत भोवते यांनी केले. आभार गोपाल हलमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)
समाज व राज्य निर्मितीत महिलांची भूमिका
By admin | Updated: March 20, 2017 01:00 IST