बोंडगावदेवी : अर्जुनी/मोर तालुक्यातील काही गावांमध्ये महाआॅनलाईन अधिकृत सेतू केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या अधिकृत महासेवा केंद्रात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची भरमसाट लूट होत असल्याची ओरड आहे. अधिकृत दरापेक्षा जास्तीचे पैसे घेवून ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिक शोषण होत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी विमा योजना शिष्यवृती अर्ज तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात भरले जात आहेत. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरिता आम आदमी विमा योजना २ आॅक्टोबर २००७ पासून राबविण्यात येत आहे. यात लाभार्थ्यांच्या नववी ते बारावी वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांना प्रति तिमाही प्रति मुलास ३०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती अर्ज महाआॅनलाईनद्वारे भरले जातात. तालुक्यातील अर्जुनी/मोर, महागाव, केशोरी, खामखुरा, कोरंभीटोला, नवेगावबांध, निमगाव या ठिकाणी आठ अधिकृत महासेवा केंद्र सुरु असल्याचे सांगण्यात आले. आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी संंबंधित केंद्रातून दामदुप्पटीने पैसे वसूल केल्या जात असल्याची ओरड आहे. सदर अर्ज भरण्यासाठी २२ रुपये ४७ पैसे शुल्क असल्याचे अधिकृत सांगण्यात येते. परंतु अधिकृत असलेल्या महासेवा केंद्रातून जास्तीचे पैसे घेतले जातात. अर्जुनी/मोर येथील एका महासेवा केंद्रात प्रती अर्ज ६० रुपये घेतल्या जाते. याची माहिती संबंधित तहसील कार्यालयात देण्यात आली. परंतु कारवाई झालेली दिसत नाही. तालुकास्थळी असलेल्या केंद्रामध्ये अशी लूट होत असेल तर अन्य ग्रामीण केंद्रात किती लूट होत असेल, असा प्रश्न निर्माण होतो. (वार्ताहर)
तालुक्यातील महासेवा केंद्रात विद्यार्थ्यांची लूट
By admin | Updated: August 8, 2014 00:04 IST