गोंदिया : शहराच्या पश्चिमेकडे सिंधी कॉलनीच्या सुरूवातीला माता भवानी चौकापासून मूर्री रेल्वे क्रॉसिंगपर्यंत रस्त्याची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठाच रोष आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची न.प. चे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दिशाभूल केल्याने आखणी रोष वाढला आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, माता भवानी चौकापासून मूर्री रेल्वे क्रॉसिंगपर्यंत जवळपास तीन किमीपर्यंत रस्ता जीर्णावस्थेत आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी न.प. चे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गुढीपाडव्यापर्यंत रस्ता दुरूस्ती करू, असे सांगितले होते. मात्र गुढीपाडवा लोटून महिनाभराला कालावधी लोटला असून सदर रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप करण्यात आले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.सदर रस्त्याचे निरीक्षण केल्यावर १० ते २० फुटापर्यंत अनेक ठिकाणी डांबरीकरण दिसून येत नाही. रस्त्यावर लहान-मोठे अनेक खड्डे आहेत. यासह दोन ठिकाणी रस्त्यावर रस्ता दुभाजक लावण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे चौपदरीकरण कमी झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांना ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. रस्ता दुभाजक एवढे तीक्ष्ण बनले आहेत की, त्यावर एखादा आदळला की तो गंभीर जखमी झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच डिव्हायडरच्या दोन्हीकडे फलकसुद्धा लावण्यात आले नाही. पथदिवे बंद असल्यावर रस्ता दुभाजकांवर नेहमी सायकलस्वार आदळताना दिसतात. सदर रस्त्यावरून अवजड वाहने एफसीआयपर्यंत जातात. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत आणखी वाढ होत आहे. रस्त्यावरची गिट्टीसुद्धा उखडून रस्त्यावर पसरलेली दिसते. वाहनांच्या सततच्या ये-जामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असते. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठाच रोष दिसून येत आहे. हा रस्ता व सदर रस्ता दुभाजक नेहमीच अपघाताला आमंत्रण देत आहे. आता जर सदर रस्ता दुरूस्त करण्यात आला नाही तर पावसाळ्यात या रस्त्यावरून चालनेसुद्धा कठिण होईल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
रस्ते जीर्ण अन् नागरिक त्रस्त
By admin | Updated: April 24, 2015 01:41 IST