ट्रकने सायकलस्वारास चिरडले : मागण्यांच्या आश्वासनानंतर शवविच्छेदनपवनी : जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाची स्थिती होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.अनिल मारोती सानगडीकर (३२) रा.रामपूरी वॉर्ड पवनी असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारला सकाळी ८.३० च्या सुमारास जवाहर गेटसमोर घडली. जनावरे भरुन नेणाऱ्या ट्रक क्रमांक सी.जी. ०४ एन ३७८७ने अनिलचा बळी घेतला. त्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त करीत जोपर्यंत ट्रक मालकास बोलावून मृतकाच्या कुटुंबियाला आर्थिक मदत दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. मृतकास पाच वर्षाचा व पावणेतीन महिन्याची एक मुलगी असून पत्नी, आई, वडील असा आप्त परिवार आहे.अनिल हा सकाळी जवाहर गेटमधून सायकलने रस्ता ओलांडून रामपूरी वॉर्डातील घराकडे जाणारा रस्ता ओलांडत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याघटनेनंतर नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलीस विभागाविरुद्ध असंतोष व्यक्त करीत हल्लाबोल केला. जवाहर गेटच्या दोन्ही बाजुने २०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन थांबून राहू नये, मृताच्या कुटुंबियाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, जवाहर गेट चौकात नियमित वाहतूक पोलीस असावा, जवाहरगेट परिसरात उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टरवर आळा घालण्यात यावा. जवाहर गेट चौक परिसर हा वर्दळीचा व शाळकरी मुले, मुली याच रस्त्याने ये जा करीत असल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरिता त्यांचेवर अंकुश लावण्यात यावा, अशा मागण्या करुन मृतदेह न उचलण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांच्या मध्यस्थीमुळे नागरिकांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह उचलण्यासाठी संमती दिल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आला. घटनास्थळावर परिस्थिती चिघळू नये, यासाठी पवनीचे ठाणेदार नगरे तसेच अड्याळचे पोलीस कर्मचारी नजर ठेवून होते. (प्रतिनिधी)
संतप्त ग्रामस्थांनी रोखला रस्ता
By admin | Updated: November 11, 2014 22:42 IST