केशोरी : केंद्र शासनाने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रासह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रक्टर होय. पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मशागतीचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती झाली आहे. साधारणत: दोन दशकापूर्वी शेतकरी शेतीची संपूर्ण मशागत, शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने आटोपत होते. त्यामध्ये प्रामुख्याने नांगरणी, वखरणी, पेरणी आणि कोळपणी अशी सर्व कामे करताना शेतकऱ्यांना मुळीच खर्च येत नव्हता. प्रत्येक शेतकरी बैलजोडी पाळत असे. ज्या शेतकऱ्यांजवळ बैलजोड्यांची संख्या जास्त तो शेतकरी श्रीमंत पाटील समजला जात होता. बदलत्या काळात यंत्रयुगाने प्रवेश करून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरीण झाले. शेतात बैलजोड्यांऐवजी ट्रॅक्टर फिरू लागले आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी शेतीची कामे, मशागत करू लागले.
.....
२० वर्षात शेतीत यांत्रिकीकरणात वाढ
गेल्या दोन दशकांपासून शेती करण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल घडून आला. आठ दिवसांची कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून दोन दिवसात व्हायला लागली. मशागतीच कामे झटपट उरकून विविध पिके शेतात डोलू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि अंग मेहनत वाचली. मॅनपाॅवर कमी झाली. मात्र, सध्या डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीच्या खर्चात कमालीची वाढ झाल्यामुळे शेतीची मशागत करणे परवडणारे नसून, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
.....
कोट :
‘शेतीची कामे झटपट व्हावीत, यासाठी ट्रॅक्टरला विविध प्रकारची अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. परंतु डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे कठीण झाले आहे. डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा’.
- दिनेश पाटील रहांगडाले, शेतकरी केळवद.
....
डिझेलच्या भाववाढीमुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे परवडणारे नसले तरी काळानुरूप बैलजोड्यांच्या सहाय्याने शेतीची मशागत करणे कठीण आहे. मॅन पाॅवर नाही, फक्त शासनाने डिझेलचे भाव कमी करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करावी, अशी अपेक्षा.
- विनोद पाटील गहाणे, केशोरी.