गोंदिया : हुडहुड या चक्रीवादळाने आंध्र व ओरिसा या राज्यांना चांगलेच झोडपून काढले असतानाच महाराष्ट्रातही पावसाळा पुन्हा परतून आल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारच्या (दि.१२) सायंकाळपासून अचानकच पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. यापावसाने सोमवारीही (दि.१३) उसंत दिली नाही. संततधार पावसाने जनजव्ीान विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सकाळपर्यंत ५१.७ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. या पावसामुळे धानाला बऱ्यापैकी दिलासा मिळाला. मात्र शेतात कापून ठेवलेल्या हलक्या धानासाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे.आंध्र व ओरीसा या राज्यांसाठी शाप ठरणारा हुडहुड चक्रीवादळ पावसाच्या रूपाने महाराष्ट्रासाठीही नुकसानदायक ठरला. या चक्रीवादळाचे पडसाद असे उमटले की रविवारपासून (दि.१२) पाऊस जिल्ह्याला झोडपून काढत आहे. रात्रभर बरसलेल्या या पावसाने सोमवारीही (दि.१३) आपला जोर दाखवून देत जनजिवन विस्कळीत सोडले. पावसाची सकाळपर्यंतची आकडेवारी बघितल्यास यात, गोंदिया तालुक्यात १३ मिमी., तिरोडा २ मिमी., गोरेगाव १३.३ मिमी., देवरी ९ मिमी., आमगाव ७.४ मिमी., सालेकसा २ मिमी., सडक अर्जुनी ७ मिमी. बरसला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाऊस बरसला नसल्याची नोंद आहे. अशाप्रकारे सकाळपर्यंत एकूण ५१.७ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली असून सोमवारी रात्री पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. (शहर प्रतिनिधी)
रिमझीम पावसाने उभ्या धानपिकाला जीवदान
By admin | Updated: October 13, 2014 23:22 IST